भारताची अव्वल दर्जाची खेळाडू सानिया मिर्झाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

सानियाने गतवर्षी मार्टिना हिंगिसच्या साथीने ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. ऑगस्टपासून त्यांनी अन्य खेळाडूंसमवेत खेळण्याचा निर्णय घेतला होता.

‘‘उजव्या गुडघ्याच्या वेदनांचा मला खूप त्रास होत आहे. चालताना मला फारसा त्रास होत नसला तरी टेनिस खेळण्यापासून मला काही महिने वंचित राहावे लागणार आहे. शस्त्रक्रिया टाळण्याचा मी प्रयत्न केला, मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी मला शस्त्रक्रियेखेरीज अन्य कोणताही पर्याय नसल्याचे सांगितले. कायमचे अपंगत्व टाळण्यासाठी ही शस्त्रक्रिया आवश्यक असल्यामुळे मी तूर्तास विश्रांती घेण्याचा व शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे सानियाने सांगितले.

‘‘राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा स्पर्धापर्यंत ती तंदुरुस्त होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. रॉजर फेडररलाही मोठय़ा दुखापतीमुळे काही महिने विश्रांती घ्यावी लागली होती. या विश्रांतीनंतरही त्याने ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अव्वल यश

मिळविले आहे. मी नेहमी त्याचाच आदर्श ठेवते,’’ असे तिने सांगितले.