सानिया मिर्झा पुढील वर्षी कोर्टवर अवतरणार

नवी दिल्ली : भारताचे टेनिसमधील प्रेरणास्थान सानिया मिर्झा जानेवारी २०२०मध्ये पुन्हा कोर्टवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत आहे. आपल्या कारकीर्दीत मी सर्व ध्येये साध्य केली आहेत, आता अखेरच्या टप्प्यात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी पुनरागमन करणार नाही, असे सानियाने सांगितले.

जवळपास दोन वर्षांच्या मातृत्वाच्या रजेनंतर सानिया आता पुनरागमन करण्यासाठी खडतर सराव करत आहे. दिवसाला किमान चार तास सराव करून सानियाने २६ किलो वजन कमी केले आहे. ‘‘कारकीर्दीत मी सर्व काही साध्य केले आहे. आता यापुढील विजेतेपदांची कमाई म्हणजे माझ्यासाठी बोनस असणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यातच पुनरागमन करण्याचा माझा विचार होता, पण आता जानेवारी महिन्यात मी कुठल्याही परिस्थितीत कोर्टवर परतणार आहे. माझा मुलगा इझान हा माझ्यासाठी प्रेरणादायी असून टेनिसवर प्रचंड प्रेम असल्यामुळेच मी पुनरागमन करण्याचा विचार केला,’’ असेही सानियाने सांगितले.

‘‘माझे शरीर कसे साथ देत आहे, याचे चित्र पुढील दोन महिन्यांत स्पष्ट होईल. मी पूर्णपणे तंदुरुस्त होत नाही, तोपर्यंत स्पर्धामध्ये सहभागी होणार नाही. पुन्हा कोर्टवर अवतरून जायबंदी होणे मला आवडणार नाही. सेरेना विल्यम्ससारखी खेळाडू आई झाल्यानंतरही ग्रँडस्लॅम स्पर्धाचे विजेतेपद पटकावत आहे, हे माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे,’’ असेही सानिया मिर्झा म्हणाली.