अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताचं आव्हान आता सानिया मिर्झा आणि तिची चिनी जोडीदार शुआई पेंग हिच्यावर आहे. आज सानिया आपला उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. मात्र हा सामना तिच्यासाठी सोपा नक्कीच राहणार नाही. कारण आपली जुनी साथीदार मार्टिना हिंगीस आणि तिच्या नवीन जोडीदारासोबत सानियाला दोन हात करावे लागणार आहेत. मार्टिना हिंगिस यास्पर्धेत युंग जान चानसोबत कोर्टवर उतरली आहे. यापूर्वी विम्बल्डनमध्ये चानने बेल्जियमच्या कर्स्टनच्या साथीने सानियाला पराभवाचा धक्का दिला होता.

याआधी सानिया मिर्झाने मर्टिना हिंगिसच्या साथीने आठ किताबांवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर दोघींनी वेगळे खेळण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या सत्रात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सानिया मिर्झा बारबोरा स्ट्रायकोवाच्या साथीने मैदानात उतरली होती. यावेळी तिला तिसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागाला. त्यानंतर विम्बल्डंनमध्येही सानियाला तिसरी फेरी पार करता आली नव्हती. फ्रेंच खुल्या स्पर्धेत सानिया यारोस्लावाच्या साथीने महिला दुहेरीच्या कोर्टवर उतरली मात्र दोघींना पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता.

यंदाच्या सत्रात सानियाने अनेकदा सहकारी बदलल्याचं पाहायला मिळालं. मध्यंतरी अमेरिकेच्या बेथानी मोटेकच्या साथीने ब्रिस्बेन डब्ल्यूटीएच्या किताबावर नाव कोरलं होतं. त्यामुळे ग्रँड स्लॅम स्पर्धांचा विचार केला असता अमेरिकन खुल्या स्पर्धेतील सानियाचा प्रवास यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. या स्पर्धेत ती अंतिम सामन्यात मजल मारणार का हे पाहणे औत्सुकतेचे असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री ९.३० वाजता सानिया मिर्झा-शुआई पेंग या जोडीचा मर्टिना हिंगिस-युंग जान चान यांच्यात उपांत्य सामना रंगणार आहे.