भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहण्यासाठी केलेल्या मागण्या परवडणाऱया नसल्यामुळे मध्य प्रदेश क्रिडा मंत्रालयाने तिला न बोलावणंच पसंत केलं आहे.
मध्य प्रदेशच्या क्रिडा आणि युवक कल्याण मंत्रालयाने खेळाडूंच्या सन्मानार्थ पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याची प्रमुख पाहूणी म्हणून सानिया मिर्झा हिला आमंत्रण देण्यात आलं होतं. तिनेही सोहळ्याला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली. पण, त्यासाठी तिने चार्टड विमान, मेक-अपचा ७०,००० रुपयांचा खर्च आणि मानधनाची मागणी केली होती. इतकंच नाही तर तिच्या स्टाफमधील पाच जणांची फी देण्याचीही मागणी तिने केली होती, असा खुलासा मध्य प्रदेशच्या क्रीडामंत्री यशोधरा राजे सिंधीया यांनी केला आहे.
सानियाची मागणी परवडणारी नसल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने ती अमान्य केली. यानंतर मंत्रालयाने हा कार्यक्रम तीन दिवसांनी पुढे ढकलला. अखेर सोमवारी सानियाऐवजी माजी बॅटमिंटनपटू पी.गोपीचंद यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
दरम्यान, यशोधरा राजे यांच्या खुलाश्यावर अद्याप सानिया मिर्झा किंवा तिच्या व्यवस्थापकीय सदस्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.