आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरी प्रकारात भारताचा झेंडा फडकवणाऱया टेनिसपटू सानिया मिर्झाला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खेलरत्न पुरस्कार निवड समितीमार्फत सानियाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून क्रिडा मंत्रालयाकडून केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. येत्या २९ ऑगस्टला क्रिडा दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या पुरस्कारामुळे सानिया मिर्झा ही खेलरत्न पुरस्काराने गौऱविण्यात येणारी पहिली महिला टेनिसपटू ठरणार आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत सानियाने मार्टिना हिंगिसच्या साथीने महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. याच वर्षी सानियाने दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या निर्धारित वेळेत शिफारस करण्याची अखिल भारतीय टेनिस संघटनेची संधी हुकली होती. मात्र गेल्या वर्षभरातल्या सानियाच्या कामगिरीची नोंद घेत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने याप्रकरणी पुढाकार घेत खेलरत्न पुरस्कारासाठी सानियाच्या नावाची शिफारस करण्याचे निश्चित केले होते. याआधी सानियाला २००४मध्ये अर्जुन तर २००६मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. गेल्या वर्षी इन्चॉन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सानियाने साकेत मायनेनीच्या साथीने मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक, तर प्रार्थना ठोंबरेच्या साथीने खेळताना महिला दुहेरीच्या कांस्यपदकावर नाव कोरले होते. २०१४मध्येच अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिने ब्रुनो सोरेसच्या बरोबरीने खेळताना मिश्र दुहेरीच्या जेतेपदावर कब्जा केला होता.
दुखापतींवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या सानियाने युवा खेळाडू घडावेत यासाठी अकादमीही स्थापन केली आहे.