लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावल्यानंतर सायना नेहवालकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. आता मलेशिया खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत तिने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत सायनाने सिंगापूरच्या गू जुआनचा सरळ सेटमध्ये पराभव केला, तर भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील उगवती तारा समजल्या जाणाऱ्या पी. व्ही. सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सिंधूला डेन्मार्कच्या टिन बाऊनने पहिल्या फेरीत पराभूत केले. याचप्रमाणे परुपल्ली कश्यपनेही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
महिलांच्या एकेरीमध्ये अव्वल मानांकन असलेल्या सायनाने येथील पुत्रा स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत जुआनवर २१-१२, २१-१५ असा २९ मिनिटांमध्ये सहज विजय मिळवला.
सिंधूने झुंजार खेळ केला खरा, पण तिला बाऊनने २१-१६, १८-२१, २१-१७ असे अटीतटीच्या लढतीत पराभूत केले. पुरुषांच्या एकेरीमध्ये गुरुसाईदत्तला सौरभ वर्माने २१-११, २१-१४ असे पराभूत केले. महिलांच्या दुहेरीमध्ये प्रज्ञा गर्दे आणि आश्विनी पोनप्पा यांनी सिंगापूरच्या सु यान व्हॅनेस्सा निओ आणि डेलिस युलअना यांना २०-२२, २१-१६, २१-१५ असे पराभूत केले. पुरुषांच्या एकेरीमध्ये भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि अक्षय देवळकर यांनी इंडोनेशियाच्या अँगा प्रतमा आणि रायन सातपुत्रा यांना २१-१२, २१-१६ असे पराभूत केले.
भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपने जपानच्या तकुमा उएडाचा ५४ मिनिटे रंगलेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात २१-१४, १६-२१, २१-५ असा पराभव केला. तथापि, अजय जयरामला पहिल्याच फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. मलेशियाच्या डॅरेन लिएवने त्याचा २१-१५, २१-११ असा पराभव केला. याचप्रमाणे मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या प्रवीण जॉर्डन आणि व्हिटा मरिस्साने तरुण कोना आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा २२-२२०, २१-१७ असा पराभव केला.