बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना, कसोटी क्रिकेटसाठी सल्लागार म्हणून काम करण्याची विनंती केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला याविषयी माहिती दिली आहे. “कसोटी क्रिकेटसाठी फलंदाजी सल्लागार या पदासाठी आम्ही संजय बांगर यांना काम करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांच्याकडून अजुनही उत्तर आलेलं नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अन्य ठिकाणाहून काही ऑफर आलेल्या आहेत.”

संजय बांगर हे २०१४ ते २०१९ या काळात भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. २०१९ विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीचा क्रम बदलण्यावरुन वाद निर्माण झाला होता. ज्याचा ठपका बांगर यांच्यावर ठेवण्यात आला होता. २०१९ साली प्रशिक्षकांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्याने मुलाखती घेण्यात आल्या…ज्याच्यात संजय बांगर यांच्याऐवजी विक्रम राठोड यांना पसंती देण्यात आली.

यानंतर संजय बांगर यांनी समालोचनाकडे मोर्चा वळवला आहे. २००१ ते २००४ या काळात संजय बांगर यांनी १२ कसोटी आणि १५ वन-डे सामन्यांत भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. सध्याच्या घडीला माजी दक्षिण आफ्रिकन खेळाडू नील मँकेंझी बांगलादेश संघासोबत मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठी काम करतोय. त्यामुळे संजय बांगर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाची ऑफर स्विकारतात का हे पहावं लागणार आहे.