बांगलादेशचा भारत दौरा हा अत्यंत महत्वाचा होता. या दौऱ्यात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या पुढाकारामुळे भारतीय संघाने आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. गुलाबी चेंडूवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात समालोचन कक्षात, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि समालोचक हर्षा भोगले यांच्या शाब्दीक द्वंद रंगलं होतं.

संध्याकाळच्या सत्रात गुलाबी चेंडू खेळाडूंना किती दिसतो यावर चर्चा सुरु असताना भोगले यांनी, याबद्दल खेळाडूंना विचारलं पाहिजे असं म्हटलं होतं. ज्यावर उत्तर देताना मांजरेकर यांनी, हर्षा ही गोष्ट तुला विचारण्याची गरज आहे आम्हाला नाही. आम्ही तेवढं क्रिकेट खेळलो आहोत…अशा शब्दात उत्तर दिलं. मांजरेकर यांचं हे वक्तव्य उद्धटपणाचं असल्याचं सांगत अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र हर्षा भोगले यांनी संजय मांजरेकर यांच्या वक्तव्याला एका खासगी कार्यक्रमात आपल्या नेहमीच्या संयमी भाषेत उत्तर देत सर्वांची मनं जिंकली.

“मला सांगायला आवडेल की या ठिकाणी मी युनिव्हर्सिटी विभागात सिनीअर लेव्हलवर क्रिकेट खेळलो आहे. अनेकांना याची कल्पनाही नसेल…या माणसाने कधी हातात बॅट घेतली आहे का?? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो…त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. मी कधीही उत्कृष्ट खेळाडू नव्हतो, मात्र मी हैदराबादमध्ये असताना या खेळातले बारकावे समजतील एवढं क्रिकेट नक्कीच खेळलो आहे. जेव्हा लोकं मला, तू किती क्रिकेट खेळला आहेस असं विचारतात तेव्हा मला राग येत नाही. आपण लोकशाहीत राहतो. प्रत्येकाला मतं असूच शकतात. मात्र कधीही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंचं म्हणणं आपण ऐकत नाही याचा मला राग आहे. क्रिकेट न खेळलेल्या एकाही व्यक्तीला समालोचनाची संधी मिळत नाही ही खरतर खेदाची गोष्ट आहे.” हैदराबादमधील एका खासगी कार्यक्रमात भोगले यांनी आपलं मत मांडलं आहे.

काही दिवसांपूर्वी संजय मांजरेकर यांनीही ESPNCricinfo या संकेतस्थळाशी बोलत असताना आपल्या त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. “मी त्यावेळी माझ्यावरचं नियंत्रण गमावून बसलो होतो. माझं ते वर्तन नक्कीच योग्य नव्हतं, मी भावनेच्या आहारी जात चुकीचं वागलो याबद्दल मला कायम खेद राहिल”, मांजरेकर यांनी आपली भूमिका मांडली.