करोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेलं आहे. सर्व आजी-माजी क्रिकेटपटू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. माजी क्रिकेटपटू समालोचक संजय मांजरेकरही या काळात घरकामात रमलेले दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरवर गवार कशी चिरायची हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

संजय मांजरेकरांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर समालोचनाकडे मोर्चा वळवला होता. आतापर्यंत अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये मांजरेकर समालोचक म्हणून काम करत आलेले आहेत. आपल्या स्पष्टवक्त्या स्वभावासाठी आणि मतांसाठी ते ओळखले जाताता. कित्येकदा याच गोष्टींमुळे त्यांना सोशल मीडियावर रोषाचाही सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मांजरेकर यांची समालोचकांच्या यादीतून हकालपट्टी केली होती.

बीसीसीआय मांजरेकर यांच्या कामावर खुश नसल्याचं समोर आलं होतं. यानंतर मांजरेकर यांनीही ट्विटरवर आपल्याला बीसीसीआयचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी समालोचक हर्षा भोगले यांच्यासोबतही संजय मांजरेकर यांचा वाद झाला होता.