भारताची उदयोन्मुख अ‍ॅथलेटिक्सपटू संजीवनी जाधवने २९व्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली आहे.

नाशिकची २० वर्षीय धावपटू संजीवनीने भुवनेश्वरमध्ये जुलै महिन्यात झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील पाच हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले होते. जागतिक शालेय ऑलिम्पियाड स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या संजीवनीच्या कारकीर्दीतील हे दुसरे महत्त्वाचे पदक आहे.

किर्गिस्तानच्या दारिया मास्लोव्हाने ३३ मिनिटे, १९.१७ सेकंद या वेळेसह सुवर्णपदक पटकावले, तर दुसऱ्या क्रमांकावरील संजीवनीने ३३ मिनिटे आणि २२ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. महिन्याच्या पूर्वार्धात लंडनमध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत झालेल्या मास्लोव्हाने अपेक्षांची पूर्तता करीत सुवर्णयश मिळवले.

प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅथलेटिक्सचे धडे गिरवण्यापूर्वी संजीवनीने कुस्ती या खेळात स्वत:ला अजमावताना जिल्हास्तरीय स्पर्धामध्येही भाग घेतला होता.