आशियाई कुमार रौप्यपदक विजेता किसन तडवी याने शेवटच्या दहा मीटर अंतरात मुसंडी मारून महापौर चषक वरिष्ठ राज्य मैदानी स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. महिलांमध्ये संजीवनी जाधव (नाशिक) हिला या शर्यतीचे विजेतेपद मिळाले.

शिवछत्रपती क्रीडानगरीत रविवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत दहा हजार मीटर अंतराची शर्यत विलक्षण रंगतदार झाली. पंचवीस फेऱ्यांच्या या शर्यतीत तडवी व कालिदास हिरवे यांच्यात प्रथम स्थानासाठी चुरस दिसून आली. शेवटच्या दहा मीटर अंतरात तडवी याने जोरदार मुसंडी मारून हिरवे याला मागे टाकले. त्याने हे अंतर ३१ मिनिटे ५६.५ सेकंदात पार केले. हिरवे याने त्यानंतर एक सेकंदाने अंतिम रेषा पार केली. पुरुषांच्या उंच उडीत सर्वेश खुशारे (सांगली) याला सुवर्णपदक मिळाले तर गोळाफेकीत श्रीनिवास कराळे (अहमदनगर) याला प्रथम स्थान मिळाले.

महिलांमध्ये संजीवनी हिने दहा हजार मीटर अंतराची शर्यत ३७ मिनिटे ७.६० सेकंदात जिंकली. पुण्याच्या अर्चना आढाव हिने १५०० मीटर अंतराच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. हे अंतर पार करण्यास तिला ४ मिनिटे ४० सेकंद वेळ लागला. ठाण्याच्या श्रद्धा घुले हिने लांब उडीत सुवर्णपदक (५.९६ मीटर) पटकाविले. तिचीच सहकारी सारा व्होरा हिने थाळीफेकीत प्रथम स्थान (३५.८ मीटर) मिळविले.

गटवार निकाल

पुरुष-उंच उडी-१.सर्वेश खुशारे, २.मुकेशसिंग. गोळाफेक-१.श्रीनिवास कराळे, २.मेलविन थॉमस. महिला-लांब उडी-१.श्रद्धा घुले, २.अस्मिता डावरे. १५०० मीटर धावणे-१.अर्चना आढाव, २.रिशुसिंग. १० हजार मीटर धावणे-१.संजीवनी जाधव, २.संगीता नायक. थाळीफेक-१.सारा व्होरा, २.श्रुती व्होरा.