पृथ्वीवरचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरला गेली अनेक दशकं हिंसक वातावरणाचं ग्रहण लागलं आहे. सीमेपलिकडून होणारा हिंसाचार, स्थानिक फुटीरतावाद्यांकडून होणारे हल्ले या वातावरणात स्थानिक तरुण चुकीच्या मार्गाला लागल्याची अनेक उहाहरण आपली पाहिली असतील. कित्येक वेळा काश्मीरमध्ये सैन्यदलावर दगडफेकीदरम्यान हीच स्थानिक मुलं आघाडीवर असतात. मात्र मध्यंतरीच्या काळात काही तरुणांनी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून काश्मीरची ही ओळख बदलण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटपटू परवेझ रसूल, आयलीगमध्ये उत्तम कामगिरी करणारा काश्मिरचा फुटबॉल संघ यांनी आपल्या राज्याचं एक सकारात्मक चित्र देशासमोर मांडलं. या यादीमध्ये आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन घरच्यांच्या सहाय्याने व्हॉलीबॉलकडे वळलेला साकलेन तारिक, आगामी प्रो-व्हॉलीबॉल लिगच्या माध्यमातून काश्मिरचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.

साकलेन जम्मू काश्मीरच्या पूँछ जिल्ह्याचा रहिवासी. अन्य भागांप्रमाणे या भागालाही हिंसाचाराचा फटका बसला आहे. आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ तारिकने सीमेपलिकडून होणारा गोळीबार, अतिरेकी हल्ले यातून स्वतःला वाचवण्यात घालवला. मात्र घरच्यांच्या सहाय्याने साकलेनला आपल्या आयुष्यात काही गोष्ट सिद्ध करुन दाखवण्यासाठी एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे व्हॉलीबॉल. आपल्या व्हॉलीबॉलमधील छोटेखानी कारकिर्दीतून मिळालेल्या यशाचं श्रेय साकलेन अगदी सहजतेने आपल्या परिवाराला देतो. त्यांनी माझ्यासाठी कष्ट घेतले नसते तर मी आज इकडे नसतो, साकलेनने आपल्या घरच्यांचे आभार व्यक्त केले.

“माझे वडील पूँछमध्ये स्थानिक व्हॉलीबॉल अकादमी चालवतात. मी लहान असताना ते मला आपल्यासोबत घेऊन जायचे. वडिलांसोबत खेळ बघायला जात असताना मला त्याची आवड निर्माण झाली. मात्र या मार्गातही मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येक वेळी घराबाहेर पडलो की मी व्यवस्थित घरी येईन की नाही याची आईला काळजी असायची, तिची काळजी करणंही योग्य होतं, कारण तिने तिच्या जवळच्या व्यक्तींना गोळीबारात प्राण गमावताना पाहिलं आहे. मात्र यावेळी बाबा माझ्यापाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. माझे वडील मोहम्मद तारिक खानही चांगले खेळाडू होते, मात्र काही कारणांमुळे त्यांना मोठ्या पातळीवर खेळण्याची संधी मिळाली नाही. पण मी जर काश्मीरमध्ये राहिलो असतो, तर इतर मुलांप्रमाणे माझं भविष्यही तसंच झालं असतं. कदाचीत इतरांप्रमाणे मी देखील दगडफेकीमध्ये सहभागी झालो असतो. त्यामुळे प्रसंगी आईचा विरोध पत्करुन वडिलांनी मला लुधियानाला शिक्षणासाठी पाठवलं.” साकलेन आपल्या काश्मीरमधील दिवसांबद्दल बोलत होता.

“मी लुधियानात शिक्षणासाठी गेल्यानंतर मला नेहमी घरची आठवण यायची. मी वडिलांना मला घरी यायचंय असं सांगितलं, अखेर वडिलांनी शिक्षकांना विनंती करुन काही दिवसांसाठी मला घरी नेलं. पण घरी गेल्यानंतर वडिल माझ्यासाठी काही दिवस बोललेच नाही. त्यावेळी वडिलांनी माझं करिअर घडवण्यासाठी किती त्याग करत आहेत, याची जाणीव झाली. मी काही दिवसांनी वडिलांना शिक्षणासाठी परतण्याचा निर्णय सांगितला. त्यावेळी आनंदी झालेल्या वडिलांनी मला मिठी मारली.” 6 फुट 3 इंच साकलेन आपल्या वडिलांबद्दल बोलताना भावूक झाला होता.

आगामी प्रो-व्हॉलीबॉल लिगमध्ये साकलेन यू मुम्बा व्हॉली संघाकडून खेळणार आहे. यासाठी साकलेनवर 1 लाखांपेक्षा जास्त रकमेची बोली लावली आहे. व्हॉलीबॉल सारख्या खेळात सुरुवातीच्या क्षणाला ही बोली मोठी असल्याचं साकलेन म्हणतो. आशियाई देशांमध्ये चीन, कोरिया, जपान सारखे देश व्हॉलीबॉलमध्ये सर्वोत्तम मानले जातात. मात्र आशियाई खेळांमध्ये इराणने सुवर्णपदक मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. इराणच्या संघाकडून भारताने शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. यावेळी आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल साकलेनने भारतीय व्हॉलीबॉल संघटनेचे आभार मानले. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत साकलेनच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.