राष्टकुल क्रीडा स्पध्रेत दुसऱ्यांदा शिस्तभंग केल्याप्रकरणी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आल्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीला मुकावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बेशिस्त वर्तनाबद्दल सरदारला पिवळे कार्ड दाखविण्यात आले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याच्याकडून तशीच चूक पुन्हा झाल्यामुळे त्याला पुन्हा पिवळे कार्ड दाखविण्यात आले. त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. मात्र संघव्यवस्थापनाने या निर्णयाविरुद्ध अपील केले. सरदारने हेतूपूर्वक खेळाडूला धक्का दिला नाही व त्याच्याकडून नकळत चूक झाली, असा युक्तिवाद भारतीय संघ व्यवस्थापनाने केला होता. हा युक्तिवाद मान्य करीत सरदारला एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली.  
‘‘पंच समितीने आमची बाजू ऐकली व आमचा युक्तिवाद मान्य केल्यामुळे आम्ही पुन्हा त्या निर्णयाविरुद्ध अपील केले नाही. सरदारकडून एकदा चूक झाली, हे आम्हालाही मान्य आहे. एका सामन्याची बंदी हा योग्य निर्णय आहे.’’
नरेंद्र बात्रा हॉकी इंडियाचे सचिव