जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं. पुनर्विकसित करण्यात आलेल्या या मैदानावर कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळण्यात येणार आहेत. तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात होणाऱ्या गुलाबी चेंडूने खेळण्यात येत आहे.

सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव असलेल्या स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम केल्याने नेटीझन्स प्रचंड संतापले. हे स्टेडियम अभिमानास्पद आहे पण नाव बदलणं ही बाब शरमेची आहे, अशा भावना ट्विटरवर उमटल्या.

उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्टेडियमचं वेगळेपण अधोरेखित केलं. त्याचबरोबर हे नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं, जे आज पूर्ण झालं आहे, असं शाह यांनी सांगितलं. “गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी अशा प्रकारच्या स्टेडियमचं स्वप्न बघितलं होतं, जे आज पूर्ण झालं आहे. या नवं स्टेडियम जगातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या स्टेडियमच्या आधारवर विकसित करण्यात आलेलं आहे. मोदी यांच्यासोबत खुप वर्षांपासून काम करत आहे. त्यांनी तरुणांना नेहमीच खेळासाठी प्रोत्साहित केलं आहे,” असं शाह यांनी यावेळी सांगितलं.