वर्षांतील अखेरच्या, पण मानाच्या समजल्या जाणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. अग्रमानांकित सेरेना विल्यम्स आणि नोव्हाक जोकोव्हिच यांचे सामने पहिल्याच दिवशी असून जेतेपदासाठी ते सज्ज झाले आहेत.
महिला एकेरीमध्ये सेरेनाचा पहिला सामना रशियाच्या व्हिटालिया दिएतचेंकोविरुद्ध होणार आहे. सेरेनाविरुद्ध खेळताना मारिया शारापोव्हाला २० पैकी १८ लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असून या दोघी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमने-सामने येतील, असे तर्क वर्तवण्यात येत आहेत.
या स्पर्धेचे दुसरे जेतेपद पटकावण्यासाठी सर्बियाचा जोकोव्हिच सज्ज झाला आहे. त्याचा पहिला सामना सोमवारी ब्राझीलच्या जोआओ सूझाबरोबर होणार आहे. तर स्पेनच्या राफेल नदालची सलामीची लढत सोमवारी क्रोएशियाच्या बोर्ना कोरिकविरुद्ध होणार आहे. सोमवारीच दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररचा सामना अर्जेटिनाच्या लिओनाडरे मायेरबरोबर होणार आहे.

जिंकण्याचे दडपण न घ्यायला माझे प्राधान्य असते. पण जिंकण्याचे दडपण तुमच्यावर येतच असते, या दडपणावर तुम्ही कशी मात करता ते महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला हे दडपण हाताळता येते असे नाही. पण मला या दडपणाबाबत जास्त काहीच वाटत नाही. सामना जिंकू किंवा हरू, याची पर्वा मी कधीच करत नाही. कारण झोकून देऊन खेळायला मला नेहमीच आवडते. चांगला सराव झाल्यामुळे या जेतेपदासाठी माझा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
सेरेना विल्यम्स.

इतिहास रचायला सेरेना सज्ज
सेरेनाने या मोसमात तिन्ही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकल्या असून, या अमेरिकन स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातल्यावर सेरेना चारही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकणारी १९८८ सालानंतर पहिली महिला टेनिसपटू ठरणार आहे. १९९९मध्ये १७ वर्षांची असताना सेरेनाने आपले पहिले जेतेपद याच स्पर्धेत पटकावले होते.
सेरेनाने आतापर्यंत विम्बल्डन, अमेरिकन स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धा प्रत्येकी सहा वेळा जिंकली आहे, तर तीन वेळा फ्रेंच खुली स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे सेरेनाने हे जेतेपद पटकावले, तर ती स्टेफी ग्राफच्या २२ ग्रॅण्ड स्लॅमशी बरोबरी करू शकेल. महिलांमध्ये सर्वाधिक २४ जेतेपदे ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या नावावर आहेत.