बहीण व्हीनसवर विजयासह उपांत्य फेरीत
जोकोव्हिच, चिलीचची आगेकूच
कॅलेंडर ग्रॅण्ड स्लॅम पटकावण्यासाठी तय्यार सेरेना विल्यम्सने बहीण व्हीनस विल्यम्सला नमवत दमदार वाटचाल केली. उपांत्य फेरीत सेरेनाचा मुकाबला तिशी ओलांडलेल्या अनुभवी रॉबर्टा व्हिन्सीविरुद्ध होणार आहे. रॉबर्टाने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान क्रिस्तिना लाडेनोव्हिकवर मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. पुरुषांमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने सहज विजय मिळवत सुसाट सफर कायम राखली. गतविजेत्या मारिन चिलीचला उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासाठी जो विल्फ्रेड सोंगाविरुद्ध पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने उपांत्य फेरीत आगेकूच केली.
१९८८ नंतर कॅलेंडर ग्रॅण्ड स्लॅमचा विक्रम नावावर करण्यासाठी उत्सुक सेरेनासमोर उपांत्यपूर्व फेरीत व्हीनसचे आव्हान होते. घरात एकत्रच टेनिसची धुळाक्षरे गिरवणाऱ्या व्हीनसला ६-२, १-६, ६-३ सेरेनाने असे नमवले. सेरेना-व्हीनस २७ लढतींमध्ये सेरेना १६-११ अशी आघाडीवर होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सेरेनाला टक्कर देणाऱ्या खेळाडूंमध्ये व्हीनसची गणना होते. मात्र दुखापती आणि खराब फॉर्मच्या फेऱ्यात अडकलेल्या व्हीनसची जागतिक क्रमवारीत घसरण झाली. यंदा घरच्या मैदानावर कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या व्हीनसचा मार्ग सेरेनानेच रोखला.
युवा ऊर्जा आणि अनुभवाची शिदोरी असे वर्णन झालेल्या लढतीत ३२ वर्षीय रॉबर्टा व्हिन्सीने २२ वर्षीय क्रिस्तिना लाडेनोव्हिकवर ६-३, ५-७, ६-४ असा विजय मिळवला. पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये क्रिस्तिनाने बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये रॉबर्टाने लौकिकाला साजेसा खेळ करीत बाजी मारली. मानांकनही न मिळालेल्या रॉबर्टाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याचा विक्रम नावावर केला. १८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या एकेरी प्रकारात अंतिम चारमध्ये खेळण्याची रॉबर्टाची ही पहिलीच वेळ आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित जोकोव्हिचने फेलिसिआनो लोपेझवर ६-१, ३-६, ६-३, ७-६ (७-२) अशी मात केली. २२ ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये २१वेळा जोकोव्हिचने अंतिम चारमध्ये स्थान पटकावले आहे. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये सलग २६ वेळा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या जोकोव्हिचने अमेरिकन खुल्या स्पर्धेतील ५५व्या विजयाची नोंद केली. विजयासह जोकोव्हिचने लोपेझविरुद्ध १३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. गतविजेत्या चिलीचने मॅरेथॉन लढतीत जो विल्फ्रेड सोंगाचा ६-४, ६-४, ३-६, ६-७ (३), ६-४ असा पराभव केला. पहिल्या दोन्ही सेटमध्ये वर्चस्व गाजवत चिलीचने सरशी साधली. तिसऱ्या सेटमध्ये सोंगाने आक्रमक खेळ करीत बाजी मारली. चौथ्या सेटमध्ये चिलीचने तीन मॅचपॉइंटसह सेटही गमावला. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये चिलीचने कणखरपणे खेळ केला. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत चिलीचने विजय साकारला.