तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५३ धावांपर्यंत मजल; सिद्धेश, हार्दिक यांचीही अर्धशतके

युवा फलंदाज सर्फराज खानने (खेळत आहे १३२) झळकावलेल्या अप्रतिम शतकाला अनुभवी सिद्धेश लाड (९८) आणि हार्दिक तामोरे (५८) यांच्या अर्धशतकांची दमदार साथ लाभल्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५३ धावांपर्यंत मजल मारली.

उत्तर प्रदेशने केलेल्या पहिल्या डावातील ६२५ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई अद्यापही २७२ धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेर १३२ धावांवर नाबाद असणारा सर्फराज आणि कर्णधार आदित्य तरे (खेळत आहे ९) या जोडीवरच मुंबईच्या पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या आशा टिकून आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात सोमवारच्या २ बाद २० धावांवरून पुढे खेळताना सलामीवीर भूपेन लालवाणी आणि हार्दिक यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ७५ धावांची भर घातली. मात्र १२ षटकांच्या अंतरात भूपेन आणि हार्दिक अनुक्रमे ४३ आणि ५१ धावा करून माघारी परतले.

४ बाद १२८ धावांवरून मग संकटमोचक म्हणून ओळखला जाणारा सिद्धेश आणि २२ वर्षीय सर्फराज यांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गडय़ासाठी २१० धावांची भागीदारी रचून उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांना हैराण केले. सिद्धेश-सर्फराज यांनी तब्बल ४७ षटके फलंदाजी करताना साडे तीन तास उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांना एकही बळी मिळू दिला नाही.

परंतु या रणजी हंगामातील पहिले शतक झळकावण्यासाठी अवघ्या दोन धावांची आवश्यकता असताना सिद्धेश ९८ धावांवर बाद झाला. सर्फराजने मात्र अखेपर्यंत नाबाद राहून प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दुसरे शतक साकारले. बुधवारी अखेरचा दिवस असल्याने सामना अनिर्णित राहणार हे जवळपास निश्चित झाले असले, तरी पहिल्या डावातील आघाडीच्या तीन गुणांसाठी दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहावयास मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या जय पांडेचे झुंजार शतक

गुवाहाटी : सलामीवीर जय पांडेने (१३० धावा) साकारलेल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या शतकाच्या बळावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आसामविरुद्धच्या ‘क’ गटातील सामन्यात दुसरा डाव ९ बाद ३६५ धावांवर घोषित केला. आसामने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद १२ धावा केल्या असून अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी आणखी २८५ धावांची आवश्यकता आहे.

सोमवारच्या २ बाद १०६ धावांवरून पुढे खेळताना जयने अंकित बावणेसह तिसऱ्या गडय़ासाठी ७४ धावांची भागीदारी रचली. अंकित (३८) बाद झाल्यावर महाराष्ट्राचा डाव २ बाद १६२ वरून ५ बाद २११ असा काहीसा घसरला.

मात्र जयने सर्वप्रथम यष्टिरक्षक विशांत मोरे (५७) आणि त्यानंतर सत्यजीत बच्छाव (५१) यांच्यासह अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या गडय़ासाठी ६९ आणि ५० धावांची भागीदारी रचली. १३ चौकारांच्या साथीने १३० धावा केल्यावर जय माघारी परतला. त्यामुळे महाराष्ट्राने विजयासाठी आसामपुढे २९७ धावांचे लक्ष्य ठेवले. दिवसअखेर आसामचे शुभम मंडल आणि राहुल हजारिका अनुक्रमे ७ आणि १ धावेवर खेळत आहेत.

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश (पहिला डाव) : ८ बाद ६२५ (डाव घोषित)

मुंबई (पहिला डाव) : ९० षटकांत ५ बाद ३५३ (सर्फराज खान खेळत आहे १३२, सिद्धेश लाड ९८, हार्दिक तामोरे ५८; अंकित राजपूत ३/६३)