दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू अँड्रील फेलुक्वायोवर वर्णभेदी टिका करणाऱ्या पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. मंगळवारी दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, सर्वच स्तरातून सरफराजवर टीकेची झोड उठवण्यात आली. अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूंनीही सरफराजच्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. यानंतर सरफराजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

“जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. त्यावेळी जे शब्द माझ्या तोंडातून रागाच्या भरात निघून गेले, मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, परंतू स्टम्पजवळचे माईक सुरु आहेत याचा मला अंदाजही आला नाही.” अशा शब्दांमध्ये सरफराजने घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.