यष्टिरक्षक-फलंदाज सर्फराझ अहमदची पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर शाहीद आफ्रिदीने कर्णधारपदाचा त्याग केला.
‘‘गेल्या वर्षी सर्फराझकडे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. ट्वेन्टी-२० विश्वचषकानिशी आफ्रिदीच्या कर्णधारपदाची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सर्फराझकडे देण्यात आले आहे,’’ असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) स्पष्ट केले आहे.
नेतृत्व सोपवण्यासाठी २८ वर्षीय सर्फराझ हा उत्तम पर्याय उपलब्ध होता, असे भाष्य पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सध्याच्या घडामोडींबाबत केले आहे. खान म्हणाले, ‘‘सकाळी माझे सर्फराझशी बोलणे झाले. त्याला नेतृत्वाच्या जबाबदारीची कल्पना दिली. नव्या भूमिकेसाठी माझ्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी असतील.’’
भारतात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने चारपैकी तीन सामने गमावल्यामुळे साखळीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. या पाश्र्वभूमीवर कर्णधार आफ्रिदी आणि प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. मग मंगळवारी पीसीबीने राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली.