रेल्वे क्रीडा विकास मंडळाला सांघिक जेतेपद

राष्ट्रीय महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत अनुभवी खेळाडूंचाच दबदबा पाहायला मिळाला. सर्जुबाला देवी, एल. सरिता देवी आणि सोनिया लाथेर यांनी आपापल्या गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

जागतिक स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेती खेळाडू सर्जुबाला देवीने ४८ किलो वजनी गटात बाजी मारली. रेल्वे क्रीडा विकास मंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्जुबाला देवीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले, तसेच रेल्वे मंडळाने सांघिक जेतेपद पटकावले. मणिपूरच्या सर्जुबालाने अंतिम लढतीत हरयाणाच्या रितूचे आव्हान ३-२ असे परतवून लावले. या स्पर्धेत मणिपूरकडून पदक पटकावणारी ती एकमेव खेळाडू ठरली. राष्ट्रीय स्पर्धेतील तिचे हे सलग दुसरे जेतेपद आहे.

माजी जागतिक आणि आशियाई विजेत्या एल. सरिता देवीने (६० किलो) अखिल भारतीय पोलीस संघाचे प्रतिनिधित्व करताना रेल्वेच्या पवित्रावर विजय मिळवला. जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेती सोनिया आणि गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या युवा जागतिक स्पर्धेतील विजेती शशी चोप्रा यांच्या लढतीने सर्वाचे लक्ष वेधले. ५७ किलो वजनी गटाच्या या लढतीत सोनियाने अनुभवाच्या जोरावर हरयाणाच्या शशीवर मात केली.

अखिल भारतीय पोलीस संघाच्या मीना कुमारीने ५४ किलो वजनी गटात हरयाणाच्या मनीषावर, रेल्वेच्या राजेश नरवालने ४८ किलो गटात उत्तर प्रदेशच्या मोनिकावर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. हरयाणाच्या पूजा राणीने ७५ किलो वजनी गटात आसामच्या अलारी बोरोवर विजय मिळवला. रेल्वे मंडळाने हरयाणाची बॉक्सिंगमधील मक्तेदारी मोडताना पाच सुवर्ण व दोन कांस्यपदकांसह सांघिक जेतेपद पटकावले. हरयाणाला तीन सुवर्णपदकांवर समाधान मानावे लागले.

इतर निकाल

६० ते ६४ किलो : प्विलाओ बसुमातरी (रेल्वे) वि. वि. सिमरनजीत कौर (पंजाब) ५-०; ६४ ते ६९ किलो : पूजा (रेल्वे) वि. वि. लवलीना बोर्गोहेन (आसाम) ३-२; ७५ ते ८१ किलो : भाग्यबती कचरी (रेल्वे) वि. वि. कलावंती (हरयाणा) ४-१; ८२ किलो : सीमा पूनिया (रेल्वे) वि. वि. कविता चहल (अखिल भारतीय पोलीस) ५-०