गतविजेता लक्ष्य सेनने सारलॉलक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद राखण्याचे ध्येय ठेवले आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत लक्ष्यसह अजय जयराम आणि शुभंकर डे यांच्यावरही भारताची भिस्त आहे.

लक्ष्यला नुकत्याच झालेल्या डेन्मार्क खुल्या स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र डेन्मार्कमधील पराभवानंतर लक्ष्यने गेले आठ दिवस कसून सराव केला आहे. गेल्या वर्षी लक्ष्यने पाच विजेतेपदे पटकावली होती. त्यात सारलॉलक्स विजेतेपदाचा समावेश आहे. गतविजेता असल्याने लक्ष्यला यंदा पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. अन्य भारतीयांमध्ये शुभंकरने २०१८ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. २

सहावा मानांकित शुंभकरलाही पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. जयरामसमोर पहिल्या फेरीत बेल्जियमच्या मॅक्सिम मॉरील्सचे आव्हान असणार आहे. महिलांमध्ये मालविका बनसोड इस्टोनियाच्या क्रिस्तिन क्युबाशी दोन हात करेल.

लक्ष्यने डेन्मार्कमध्ये झालेल्या पराभवानंतर या स्पर्धेची कसून तयारी करताना शनिवारी डॅनिश लीगमध्येही सहभाग घेतला होता.