ड्वेन ब्राव्होच्या सहा विकेट्स आणि रामनरेश सरवानच्या नाबाद शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात विकेट्सने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेच्या डावाला ड्वेनने चांगलेच हादरे दिले. त्याने ४३ धावांत ६ फलंदाजांना बाद केल्यामुळे झिम्बाब्वेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वूसी सिबांडा (५१), हॅमिल्टन मसाकाझा (६०) आणि क्रेग इरव्हिन (८०) यांच्या खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने पहिल्यांदा फलंदाजी करताना २७३ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना किरान पॉवेल (५७) आणि सरवान यांनी १११ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पॉवेल बाद झाल्यावर सरवानने ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद १२० धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.