News Flash

सतनाम वाहे पुत्तर!

सरसो का साग आणि मक्के दी रोटीसाठी प्रसिद्ध पंजाबचा रांगडा सतनाम सिंग ‘नॅशनल बास्केटबॉल लीग’ (एनबीए) या जगविख्यात लीगमधील संघासाठी निवड होणारा पहिला भारतीय खेळाडू

| June 27, 2015 06:31 am

सरसो का साग आणि मक्के दी रोटीसाठी प्रसिद्ध पंजाबचा रांगडा सतनाम सिंग ‘नॅशनल बास्केटबॉल लीग’ (एनबीए) या जगविख्यात लीगमधील संघासाठी निवड होणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. ‘डल्लास मॅव्हरिक्स’ संघाने सतनामला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. लुधियानाजवळच्या ‘बल्लो के’ या छोटय़ाशा गावातल्या सतनामची ही भरारी भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी आणि देशभरात बास्केटबॉलच्या प्रसारासाठी प्रेरणादायी आहे.
७ फूट आणि २ इंच अशी प्रचंड उंची लाभलेला सतनाम गेली पाच वर्षे अमेरिकामधील फ्लोरिडा येथील अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. आयएमजी रिलायन्स अकादमी आणि भारतीय बास्केटबॉल महासंघ यांच्यातील करारानुसार देशभरातल्या मोजक्या प्रतिभावान बास्केटबॉलपटूंना अमेरिकेत प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे. एप्रिल २०१५ मध्ये एनबीए आराखडय़ासाठी सतनामची निवड झाली होती. कोणत्याही शैक्षणिक संस्थेतर्फे शिष्यवृत्ती न मिळाल्याने तसेच परदेशात कोणत्याही व्यावसायिक क्लबसाठी न खेळता एनबीए संघासाठी निवड झालेला सतनाम पहिलावहिला भारतीय बास्केटबॉलपटू ठरला आहे.
सतनामने २०११ आणि २०१३ मध्ये फिबा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
काही दिवसांपूर्वीच भारतीय वंशाच्या कॅनडास्थित सिम भुल्लरने एनबीए संघातर्फे खेळण्याचा मान पटकावला होता. सतनामच्या डल्लास मॅव्हरिक्स संघाने १९८७, २००७, २०१० मध्ये डिव्हिजन अजिंक्यपद, २००६, २००१ मध्ये कॉन्फरन्स अजिंक्यपद तसेच २००१ मध्ये एनबीए अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

‘‘एनबीए संघासाठी निवड होणे हे अविश्वसनीय आहे, पण हे प्रत्यक्षात साकारले आहे. माझ्या निवडीमुळे देशभरातल्या बास्केटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या स्वप्नाला बळकटी मिळेल अशी आशा आहे. भविष्यात देशात बास्केटबॉलच्या प्रसाराला गती मिळेल.’’  -सतनाम सिंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2015 6:31 am

Web Title: satnam singh bhamar become first nba player from india
Next Stories
1 पेरूचा वारू झोकात!
2 ‘धोनीने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान विसरू नका’-आफ्रिदी
3 कॅनडा बॅडमिंटन स्पर्धा : अजय, साईप्रणीत, ज्वाला-अश्विनी उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X