जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

तमाम चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर असतानाही सातत्याने सुरेख कामगिरी करणाऱ्या भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना शनिवारी अखेरीस क्रीडाप्रेमींच्या अपेक्षांची पूतर्ता करण्यात अपयश आले.

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतील उपांत्य सामन्यात इंडोनेशियाची अग्रमानांकित जोडी मार्कस गिदोन आणि केव्हिन सुकामुल्जो यांच्याविरुद्ध सात्त्विक-चिराग या बिगरमानांकित जोडीचा संघर्ष अपुरा पडल्याने त्यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

फुजहोऊ येथील ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरवर रंगलेल्या या उपांत्य सामन्यात मार्कस-केव्हिन यांनी सात्त्विक-चिराग यांना २१-१६, २२-२० असे दोन गेममध्ये पराभूत केले. हा सामना ४१ मिनिटे रंगला. रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत मार्कस-केव्हिन यांच्यापुढे जपानच्या ताकेशी कुमारा आणि केगो सोनाडा यांचे आव्हान असणार आहे.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणाऱ्या सात्त्विक-चिराग यांनी उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या तिसऱ्या मानांकित ली जून हुई आणि लिऊ यू चेन यांना २१-१९, २१-१५ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली होती. त्यामुळे या सामन्यातही त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा होती.

सात्त्विक-चिराग मार्कस-केव्हिनपुढे पहिल्या गेममध्ये निष्प्रभ ठरले. इंडोनेशियाच्या जोडीने मध्यंतराला ११-९ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर सात्त्विकने काही दमदार स्मॅशेस लगावताना एकवेळ मार्कस-केव्हिन यांची आघाडी १५-१४ अशी कमी केली होती. परंतु त्यानंतर पुन्हा क्षुल्लक चुका केल्यामुळे त्यांनी पहिला गेम १६-२१ असा गमावला.

दुसऱ्या गेममध्ये सात्त्विक-चिरागने झोकात पुनरागमन करताना मार्कस-केव्हिन यांना एकेका गुणासाठी संघर्ष करायला लावला. १७-१५ अशी आघाडी असताना सात्त्विक-चिराग यांनी सलग तीन गुण गमावले. मार्कस-केव्हिन यांनी नेटजवळून फटक्यांचा आणि दीर्घ रॅलीजवर भर केला. त्यामुळे सात्त्विक-चिराग दडपणाखाली आले. मार्कस-केव्हिनने सलग दोन गुण मिळवले. मार्कसनेच अगदी आरामात कोर्टलगत स्मॅशचा फटका लगावून विजयावर शिक्कामोर्तब केले.