थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सत्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत सोळाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यावर २२-२०, २२-२४, २१-९ अशी मात केली.
२०१८ साली सत्विकराज आणि चिराग शेट्टी जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची भारतीय जोडीची ही पहिलीच वेळ ठरली आहे. अंतिम फेरीत भारतीय जोडीसमोर तिसऱ्या मानांकित ली जुन हुई आणि ल्यू यु चेन या चिनी जोडीचं आव्हान असणार आहे.
पहिल्या सेटमध्ये कोरियन जोडीने आक्रमक सुरुवात केली, ३-० ने आघाडी घेत कोरियाच्या को संग ह्युन आणि शिन बाएक चिओल जोडीने भारतीय जोडीला बॅकफूटला ढकललं. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत कोरियन जोडी ११-१० अशी आघाडी होती. मात्र मध्यांतरानंतर भारतीय जोडीने दमदार पुनरागमन करत कोरियन जोडीला धक्का दिला. अखेरच्या मिनीटांमध्ये कोरियन जोडीने दोन ब्रेक पॉईंट मिळवत सामना बरोबरीत नेला. मात्र सत्विकराज आणि चिरागने आपला अनुभव पणाला लावत पहिला सेट खिशात घातला.
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोड्या तोडीस तोड खेळल्या, मात्र कोरियन खेळाडूंनी भारतीय खेळाडूंची झुंज मोडून काढत २२-२४ ने बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने कोरियन जोडीला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. २१-९ च्या फरकाने सेट जिंकत भारतीय जोडीने सामनाही खिशात घातला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 5:59 pm