आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची किमया साधून दाखवणारा १६ वर्षांचा नेमबाज सौरभ चौधरीला काही प्रभावी लोकांनी केलेल्या अयोग्य नियमावलीमुळे राष्ट्रीय संघातून अजून वर्षभर बाहेर रहावे लागणार असल्याचा आरोप प्रशिक्षक आणि माजी आशियाई विजेता नेमबाज जसपाल राणाने केला आहे.

उत्तर प्रदेशच्या मीरतनजीकच्या कलिना या खेडेगावातील एका शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सौरभने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकविजेत्या खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारा तो भारताचा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. मात्र संघाच्या नवीन नियमावलीत राष्ट्रीय नेमबाजी संघटनेतील आणि काही बाहेरच्या प्रभावी लोकांनी बदल केल्यामुळेच त्याला संघात येण्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.

‘‘सौरभ हा सध्या ऑलिम्पिक रौप्यविजेत्या जितू रायपेक्षाही सरस असून, तो भारताचा अव्वल नेमबाज आहे. पिस्तूलवरील त्याची पकड अयोग्य असल्याचे कारण देत त्याला संघनिवडीपासून वंचित ठेवले गेले. तो अजून खूप कोवळा असून अन्य कटू अनुभव अजून त्याच्या वाटय़ाला आलेले नाहीत. इतक्या भव्य यशानंतर पैसा, प्रसिद्धी किंवा अन्य कारणामुळे या युवा प्रतिभावान खेळाडूचे लक्ष विचलित होऊ नये असे मला वाटते,’’ असे राणा यांनी सांगितले.