आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर भारताचा 16 वर्षीय युवा नेमबाज सौरभ चौधरी याने युवा ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली. १० मीटर एअर पिस्टल प्रकारात त्याने सुवर्णपदक पटकावलं.

अंतिम फेरीत सौरभ चौधरी याने 244.2 गुण मिळवले. चौधरीला दक्षिण कोरियाच्या सुंग युन्हो याने 236.7 गुण मिळवून चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला आणि अखेर सुंग युन्हो याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर स्विझर्लंडच्या सोलारी जेसन याने 215.6 गुणांसह कांस्य पदक मिळवलं. एकूण आठ खेळाडूंमध्ये अंतिम फेरी झाली. सौरभच्या खेळाची सुरूवात खराब झाली होती, चार वेळेस त्याने 10 पेक्षा कमी गुण मिळवले पण त्यानंतर 18 वेळेस 10 किंवा त्यापेक्षा जास्त गुण सौरभने मिळवले आणि आघाडी कायम ठेवली. पात्रता फेरीतही एकूण 580 गुण मिळवून सौरभ चौधरी अव्वल ठरला होता.

यापूर्वी मंगळवारी भारताची १६ वर्षीय नेमबाज मनू भाकरने युवा ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. मनूने २३६.५ अंकांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताला युवा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत मिळालेले हे पहिलेवहिले सुवर्णपदक ठरले.