News Flash

सौ‘रन’ तिवारी

यंदाच्या रणजी हंगामात धावांची टांकसाळ उघडलेल्या सौरभ तिवारीने अव्वल क्रमांकावर विराजमान असलेल्या मुंबईला पहिल्याच दिवशी पिदवले. अननुभवी कप्तानी आणि स्वैर माऱ्याचा पुरेपूर फायदा उचलत

| December 7, 2013 02:35 am

* सौरभ तिवारीचे झुंजार शतक * झारखंड ८ बाद २६२
यंदाच्या रणजी हंगामात धावांची टांकसाळ उघडलेल्या सौरभ तिवारीने अव्वल क्रमांकावर विराजमान असलेल्या मुंबईला पहिल्याच दिवशी पिदवले. अननुभवी कप्तानी आणि स्वैर माऱ्याचा पुरेपूर फायदा उचलत तिवारीने हंगामातील पहिले शतक झळकावत सर्वाधिक धावा (६६०) आपल्याच नावावर कायम ठेवल्या. मुंबईच्या गोलंदाजीला बेमालूमपणे खेळून काढत तिवारीने एकहाती संघाला दिवसअखेर ८ बाद २६२ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकत झारखंडला फलंदाजीला पाचारण केले आणि त्याचा फायदा फक्त तिवारीलाच उचलता आला. संघात परतलेल्या मध्यमगती गोलंदाज जावेद खानने दोन्ही सलामीवीरांना अवघ्या १३ धावांमध्ये तंबूत धाडले खरे, पण त्यानंतर मात्र मैदानाचा कब्जा तिवारीनेच घेतला. अडखळत सुरुवात करणाऱ्या तिवारीने स्थिरस्थावर झाल्यावर मुंबईच्या गोलंदाजीला आपल्या तालावर नाचवले. पहिल्या सत्रात त्याने अर्धशतक झळकावत संघाला शतक पूर्ण करून दिले. चहापानापर्यंत मोसमातील पहिले शतक झळकावत संघाला द्विशतकाच्या (८ बाद १९५) उंबरठय़ावर पोहोचवले, तर तिसऱ्या सत्रात कर्णधार अभिषेक नायरला ‘मिड ऑफ’ला मुंबईच्या पॅव्हेलियनच्या दिशेने खणखणीत षटकार खेचत दीडशे धावा पूर्ण केल्या. तिवारीने नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एस. एस. रावच्या (नाबाद ५, ६४ चेंडू) साथीने ८२ धावांची अभेद्य भागीदारी रचत दिवसअखेपर्यंत किल्ला लढवला आणि मुंबईला हतबल करून सोडले. तिवारीने ३५४ मिनिटे किल्ला लढवत २६४ चेंडूंत १८ चौकार आणि ८ षटकारांच्या जोरावर नाबाद १७५ धावांची अप्रतिम खेळी साकारली.
मुंबईची बचावात्मक वृत्ती या वेळी त्यांच्या अंगलट आली. बोथट मारा आणि पारंपरिक क्षेत्ररक्षणाचा तिवारीने चांगलाच फायदा घेत मुंबईला निष्प्रभ करून सोडले.

संक्षिप्त धावफलक
झारखंड (पहिला डाव) : ९० षटकांत ८ बाद २६२ (सौरभ तिवारी नाबाद १७५; जावेद खान ४/६१) वि. मुंबई

      आजच्या दिवसात खास करून तिसऱ्या सत्रामध्ये सौरभ तिवारीने चांगली फलंदाजी केली. त्याच्या धावा रोखून समोरच्या फलंदाजाला बाद करण्याचा आमचा प्रयत्न होता, पण त्यामध्ये आम्हाला यश मिळाले नाही. आम्ही ‘बेसिक्स’वर लक्ष केंद्रित करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा आमचा प्रयत्न होता. शनिवारी (उद्या) नव्याने सुरुवात करू आणि झारखंडला झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी खास रणनीती आम्ही आखणार आहोत. सामन्यात चार विकेट्स मिळाल्याने बरे वाटत असले तरी झारखंडला झटपट बाद करण्याची संधी गमावल्याचे वाईटही वाटत आहे.                       – जावेद खान, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:35 am

Web Title: saurabh tiwary slams career best 175 to rescue jharkhand vs mumbai
Next Stories
1 गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे हरलो -धोनी
2 धोनीचा आणखी एक विक्रम
3 प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व गमावले-सचिन
Just Now!
X