बॅडमिंटनपटू सायली गोखलेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या मुख्य फेरीत जाण्याची संधी थोडक्यात हुकली. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात सायलीने विजय मिळवला, मात्र दुसऱ्या सामन्यात तिला पराभवाला सामोरे जावे लागले.
पहिल्या सामन्यात सायलीने अवघ्या २३ मिनिटांत श्रीलंकेच्या काविंदी इशांडिका सिरिमानगेचे आव्हान २१-१६, २१-१४ असे संपुष्टात आणले. पुढच्या सामन्यात चायनीज तैपेईच्या या चिंग ह्स्युने सायलीवर २१-२३, २१-१०, २१-१० असा विजय मिळवला. बुधवारपासून स्पर्धेचे मुख्य फेरीचे सामने सुरू होणार आहेत. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असणाऱ्या कश्यपची दक्षिण कोरियाच्या जि हून हांगशी लढत होणार आहे. या स्पर्धेकरिता चौथे मानांकन देण्यात आलेल्या कश्यपला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यात फार अडथळा येण्याची शक्यता नाही. मात्र उपांत्य फेरीत त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन लाँगचे आव्हान असणार आहे. बी.साईप्रणीथची लढत मालदीवच्या मोहम्मद अजफान रशीदशी होणार आहे.
महिलांमध्ये युवा पी.व्ही.सिंधूचा मुकाबला हाँगकाँगच्या त्सेझ का चानशी होणार आहे. मात्र दुसऱ्याच फेरीत तिच्यासमोर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या वांग सिझियानचे आव्हान असणार आहे.  
पुरुष दुहेरीत तरुण कोना-अरुण विष्णू जोडीसमोर व्हिएतनामच्या बाओ डय़ुक डय़ुआंग आणि होआंग नाम ग्युयेनचे आव्हान असणार आहे. प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर याचप्रमाणे मनू अत्री आणि सुमीत रेड्डी हेही सहभागी होत आहेत.
दरम्यान, महिला दुहेरीत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर अश्विनी पोनप्पा आणि प्रज्ञा गद्रे यांना चांगल्या सरावाची संधी आहे. या जोडीची सलामीची लढत पेई रांग वांग-क्युओ यु वेनशी होणार आहे. अपर्णा बालन आणि एन.सिक्की रेड्डी यांचा मुकाबला सिआओ ह्य़ुन चेन-चिआ वेन लाअशी या जोडीशी होणार आहे.
मिश्र दुहेरीत तरुण कोना-अश्विनी पोनप्पा, अरुण विष्णू-अपर्णा बालन आणि प्रज्ञा गद्रे-अक्षय देवलकर या तीन जोडय़ा सहभागी होत आहेत.