कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. सुपर लिग ब गटात मुंबईने कर्नाटकवर ७ गडी राखून मात केली. कर्नाटकने विजयासाठी दिलेलं १७४ धावांचं लक्ष्य मुंबईने सूर्यकुमार यादवच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर पूर्ण केलं.

नाणेफेक जिंकत मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकची सुरुवात खराब झाली, शम्स मुलानीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या नादात यष्टीरक्षक आदित्य तरेने राहुलला यष्टीचीत करत माघारी धाडलं. यानंतर कर्णधार मनिष पांडे आणि करुण नायरही स्वस्तात माघारी परतले. कर्नाटकचे ३ फलंदाज अवघ्या १९ धावांत माघारी परतल्यानंतर, देवदत्त पडिक्कल आणि रोहन कदम या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. पडिक्कल आणि कदम यांनी अर्धशतकी खेळी केली.

पडिक्कल ५७ धावांवर माघारी परतल्यानंतर रोहन कदमने किल्ला लढवणं सुरु ठेवलं. रोहन कदम ७१ धावा काढत शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर कर्नाटकच्या तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी संघाला १७३ धावांचा टप्पा गाठून दिला. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबेने प्रत्येकी २-२ तर शम्स मुलानीने १ बळी घेतला. कर्नाटकचा एक फलंदाज धावबाद झाला.

प्रत्युत्तरादाखल मुंबईची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ आणि आदित्य तरे माघारी परतले, यानंतर श्रेयस अय्यरही फारशी चमक दाखवू शकला नाही. मात्र यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत कर्नाटकच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. यादवने नाबाद ९४ धावांची खेळी केली, शिवम दुबेने त्याला २२ धावा काढत मोलाची साथ दिली. कर्नाटककडून रोनित मोरे, प्रवीण दुबे आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.