News Flash

सायना पदक जिंकूनच मायदेशी परतणार!

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळविणे आव्हानात्मक असले, तरी या स्पर्धेत सायना पदक मिळवूनच मायदेशी परतेल

| August 5, 2013 05:06 am

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळविणे आव्हानात्मक असले, तरी या स्पर्धेत सायना पदक मिळवूनच मायदेशी परतेल, असा आत्मविश्वास सायनाचे वडील डॉ. हरवीरसिंग नेहवाल यांनी व्यक्त केला.
गुआंगझाऊ (चीन) या शहरात सोमवारपासून या जागतिक प्रतिष्ठेच्या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्यानंतर जागतिक स्पर्धेत तिच्याकडून पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सायनाला अनुकूल मार्ग लाभला आहे. मात्र त्यानंतर तिला विजय मिळविण्यासाठी खडतर परिश्रम करावे लागणार आहेत.
‘‘जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्यासाठी तिने चांगली तयारी केली आहे. त्यामुळे सुवर्णपदक मिळविण्याचा तिला व आम्हालाही आत्मविश्वास आहे. अर्थात सामन्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य लढतीत तिच्या पायाच्या हालचाली अपेक्षेइतक्या झाल्या नाहीत. त्यामुळे तिला अंतिम फेरीत स्थान मिळविता आले नाही. परंतु चीनमध्ये या पराभवाची भरपाई ती निश्चित करेल,’’ असे डॉ. नेहवाल यांनी सांगितले. लंडन ऑलिम्पिकमध्ये तिचे सुवर्णपदक हुकल्याची खंत तुम्हाला वाटली होती काय, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘कांस्यपदकापेक्षा सुवर्णपदक केव्हाही प्रतिष्ठेचे असते. हे ध्येय साध्य करता आले नाही, याचे दु:ख आम्हा सर्वाना झाले. मात्र ऑलिम्पिक कांस्यपदकामुळे आम्हाला समाधान झाले. हे पदक नशिबाने मिळाले अशी टीका मला मान्य नाही. कारण जर हा सामना पूर्णपणे खेळला गेला असता, तर तिने विजयश्री खेचून आणली असती. तिच्याकडे शेवटच्या गुणापर्यंत झुंजण्याची क्षमता आहे.’’
‘‘सायनाच्या ऑलिम्पिक पदकामध्ये पुल्लेला गोपीचंद यांच्यासह आजपर्यंतच्या सर्व प्रशिक्षकांचा वाटा असला, तरीही गोपीसर हे तिच्यासाठी आराध्य दैवत आहे. तिच्या कारकीर्दीला सोन्याचा मुलामा देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी अतिशय जीव लावून तिला घडविले आहे,’’ असेही ते पुढे म्हणाले.
सायनाला ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने सदनिका भेट दिली आहे. भविष्यात पुण्यात स्थायिक होण्याचा विचार आहे काय, असे विचारले असता डॉ. नेहवाल म्हणाले, ‘‘पुण्यातील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. तेथे बॅडमिंटनला भरपूर संधी आहेत. जर सायनाने तेथे अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर कदाचित आम्ही तेथे स्थायिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2013 5:06 am

Web Title: sayna will return with medal says papa
Next Stories
1 अश्विनी, अजयची आज कसोटी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
2 अंबाती रायुडू, मोहित शर्मा आगामी आयपीएल लिलावासाठी पात्र
3 कांस्यपासून सुवर्णपदकापर्यंतचे स्थित्यंतर सुखावणारे -आदित्य मेहता
Just Now!
X