यष्टीरक्षक ऋषभ पंतला जे यष्टीमागे जमले नाही, ते त्याने यष्टीपुढे करुन दाखवले. त्याच्या ९७ धावांच्या दमदार खेळीने सामन्याचा नूरच पालटला. ऋषभ पंत खेळपट्टीवर असताना त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या सामन्यात ऋषभच्या बरोबरीने फिरकी गोलंदाज आर.अश्विनने सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला.

कसोटीच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी दिलेले ४०७ धावांचे लक्ष्य पार करण्याचे ठरवले होते का? त्या प्रश्नावर अश्विन म्हणाला की, “पंतने जबरदस्त खेळी केली. पंत मैदानावर असेल तर ड्रेसिंग रूममधील कोणीही आरामात खुर्चीला टेकून बसू शकत नाही, कारण पंत पुढच्या चेंडूवर काय करेल याचा कोणालाच अंदाज बांधता येत नाही. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आणि स्टाफला त्याला लवकर बाद करायचे असते तर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये त्याने कुठलाही बेजबाबदार फटका खेळू नये, यासाठी प्रार्थना सुरु असते.”

“तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टी बदलली होती. सिडनीमध्ये शेवटच्या डावात ४०० धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते. पण ऋषभच्या खेळीमुळे आम्हाला वरचढ होता आले. वीजेसारखा त्याचा वेगवान खेळ आहे. तो फलंदाजी करताना दोन्ही ड्रेसिंग रुममध्ये आपण असू नये, असे तुम्हाला वाटते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आणि स्टाफला त्याला लवकर बाद करायचे असते तर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये त्याने कुठलाही बेजबाबदार फटका खेळू नये, अशी इच्छा असते. त्यामुळे हा पुढे काय करणार या बद्दल तुम्ही विचार करता. पण सिडनीमधील त्याच्या खेळीमुळे आम्हाला वरचढ होता आले” असे अश्विन म्हणाला.

ऋषभ पंत आणि चेतेश्वर पूजारा पाठोपाठ बाद झाल्यामुळे दबाव आला होता. पण हनुमा विहारी आणि आर.अश्विनच्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवले. अश्विनच्या नाबाद ३९ धावांच्या खेळीनेही महत्त्वाची भूमिका बजावली.