शिर्डीपासून १० किलोमीटर अंतरावर साखरवाडी हे छोटेसे गाव वसलेले आहे. जेमतेम पाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव. शहरातील आकर्षक जीवनशैलीपासून खूप दूर असलेल्या या गावातील शालेय बॅडमिंटनपटूंनी आयबीएलच्या लढतीचा सोमवारी आनंद लुटला. दिग्गज बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक अनिल प्रधान यांच्या पुढाकाराने या शाळकरी मुलांचे सायना नेहवालला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचे स्वप्न साकारले.
विद्याविहार येथील सोमय्या ट्रस्टचा साखरवाडीत साखर कारखाना आहे. या कारखान्यातील कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेच्या परिसरातच बॅडमिंटनचे कोर्ट आहे. खेळाची, बॅडमिंटनची आवड असलेल्या समीर सोमय्यांनी एवढय़ा छोटय़ा गावात बॅडमिंटन कोर्ट उभारणीला प्रोत्साहन दिले. या मुलांना संजय अमोलिक मार्गदर्शन करतात. सुट्टीच्या कालावधीत या मुलांना मुंबईतील वरिष्ठ मार्गदर्शक अनिल प्रधान यांचे प्रशिक्षण लाभले. १५ दिवसांच्या या कालावधीत प्रधान सरांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे खेळातले बारकावे समजले, असे मुलांनी सांगितले.
गेली तीन वर्षे सुरू असणाऱ्या या उपक्रमाचा लाभ घेत या मुलांनी राज्य आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. याच मुलांनी मुंबईतल्या मनोरा बॅडमिंटन स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती. छोटय़ाशा गावात अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळून ही मुले बॅडमिंटनची आवड जोपासत आहेत.