ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय महिलांनी आश्वासक सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. १७ धावांनी हा सामना जिंकत भारतीय महिला संघाने महत्वाच्या स्पर्धेत विजयी सलामी दिली. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या भारतीय जोडीने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरुवात करुन दिली.

पहिल्या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिसने स्मृती मंधानाची विराट कोहलीसोबत तुलना केला आहे. “स्मृती महिला क्रिकेटची विराट कोहली आहे. सर व्हिव रिचर्ड्स यांनी आपल्या अनोख्या शैलीने क्रिकेटमध्ये काही बदल घडवून आणले…स्मृतीनेही आपल्या खेळीने महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला आहे.” समालोचनादरम्यान स्टायरिसने स्मृती मंधानाचं कौतुक केलं.

१३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली आणि पहिल्या ५ षटकांत ३० धावांची भागीदारी केली. संयमी सुरूवातीनंतर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. अडखळती सुरूवात करत १३ चेंडूत ६ धावा करणारी बेथ मूनी माघारी परतली. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगदेखील स्वस्तात माघारी परतली. सलामीवीर हेली दमदार अर्धशतकानंतर माघारी परतली. हेलीने ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५१ धावा केल्या. पण त्यानंतर ती लगेचच झेलबाद झाली.

फिरकीपटू पूनम यादवने आपला अनुभव पणाला लावत दोन चेंडूत दोन बळी टिपले. तिने आधी रॅचेल हेन्सला (६) बाद केले. तर त्यानंतर दमदार फलंदाज एलिस पेरीला पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले. पण तिची हॅटट्रिक यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे हुकली. पुढच्या षटकात पूनम यादवने चौथा बळी टिपला आणि ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. त्यानंतर यजमानांना डोकं वर काढता आलं नाही. अखेर १९.५ षटकात भारताने ऑस्ट्रेलियाला ११५ धावांत बाद केले आणि भारताने विजयी सलामी दिली. पूनम यादवने ४, शिखाने ३ तर गायकवाडने १ बळी टिपला.