04 March 2021

News Flash

चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रद्द व्हावी-शास्त्री

आणखी पाच वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटचे प्रमाण अत्यंत कमी झाले असेल.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रद्द व्हावी

 

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित स्पर्धाची संख्या खूप झाली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची आवश्यकताच नाही. ही स्पर्धा रद्द करावी’, असे परखड मत भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. ‘ग्रेस्केल एज्युकेशन’ उपक्रमाचा सल्लागार असलेल्या शास्त्री यांनी संस्थेच्या कार्यक्रमादरम्यान क्रिकेट अनुषंगिक प्रश्नांची उत्तरे दिली.

आणखी पाच वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटचे प्रमाण अत्यंत कमी झाले असेल. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमुळे विश्वचषक स्पर्धेचे महत्व कमी होते. आयसीसीच्या स्पर्धांची संख्या जास्त आहे. कोणत्या खेळात जागतिक अजिंक्यपद दर्जाच्या एवढय़ा स्पर्धा होतात? असा सवालही शास्त्री यांनी केला.

‘सामान्य क्रिकेट रसिकाला विचारले की विश्वविजेता संघ कोणता तर निश्चित असे उत्तरच देता येणार नाही. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक आयोजित होतो. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होते. विश्वचषक स्पर्धा असताना या स्पर्धेची गरजच उरत नाही. विश्वचषक विजेता संघ लक्षात राहतो. मात्र चॅम्पियन्स करंडक विजेत्या संघाची यादी लक्षात राहत नाही’, असे शास्त्री यांनी सांगितले.

२ एप्रिल, २०११ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंग धोनीने लगावलेला षटकार जगभरातल्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. कारण त्या फटक्याने देशवासियांचे विश्वविजेता संघ अनुभवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या प्रयोजनामागे काही भूमिकाच नाही.

चॅम्पियन्स करंडकाचे अस्तित्व रद्द करण्याची भूमिका घेणाऱ्या शास्त्री यांनी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या संयोजनाचे समर्थन केले. ‘आयपीएल स्पर्धा प्रथम श्रेणी क्रिकेट ढाच्याचा भाग आहे. तूर्तास प्रथम श्रेणी क्रिकेट सहा आठवडे चालते. तो कालावधी वाढून आठ आठवडय़ांचा व्हायला हवा. यामध्ये रणजी, दुलीप चषक, आयपीएल यांचा समावेश असेल. आयपीएलमध्ये आठ संघ आहेत. किमान ५६ भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या बरोबरीने खेळण्याची, वावरण्याची संधी मिळते’, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले.

क्रिकेटपटूंना मिळालेली वेतनवाढ तूटपुंजी

भारतीय क्रिकेटपटूंना देण्यात आलेली वेतनवाढ अत्यंत तूटपुंजी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने क्रिकेटपटूंच्या वेतन श्रेणीत बदल केले. नव्या संरचनेनुसार ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना २ कोटी, ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना ५० लाख रुपये असे कराराचे स्वरुप आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख तर ट्वेन्टी-२० लढतीसाठी ३ लाख रुपये असे मानधन पक्के करण्यात आले. २ कोटी रुपये अत्यंत मामुली रक्कम आहे. आयपीएल स्पर्धेत न खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला वेतनवाढीने काय मिळणार? असा प्रश्न शास्त्री यांनी मांडला. समाधानकारक वेतनवाढ मिळाली तर पुजारा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळू शकतो. खेळाडूंच्या वेतनात घसघशीत वाढ करायला हवी हा मुद्दा त्यांनी रेटला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटूंचे उत्पन भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा जास्त आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:53 am

Web Title: scrap the icc champions trophy says ravi shastri
Next Stories
1 नेयमारचा शतकी गोल!
2 दशकपूर्तीचा सोहळा
3 आधीच खडूस त्यात पुणेरी होण्याची हौस; स्टीव्ह स्मिथचे पुणेरी व्हर्जन
Just Now!
X