माडांच्या बनातून येणारी मंद हवा, समुद्राची गाज, लोकांनी भरलेले रस्ते, स्पर्धकांनी फुललेला समुद्रकिनारा. ‘गेट, सेट, गो..’नंतर स्पर्धकांनी एकत्रितपणे मारलेल्या बोटीतून समुद्रात उडय़ा आणि विजेतेपदासाठी सुरू झालेली चुरसमय शर्यत, असा नजारा चिवला समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळाला, तो सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण असोसिएशनच्या पाचव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने. या शर्यतीमध्ये एकूण १२२८ जलतरणपटूंनी सहभाग नोंदवत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शर्यतीच्या मुख्य ५ किमी गटातील पुरुषांच्या विभागात पुण्याच्या रमेश सिंगने तर महिलांमध्ये साताऱ्याच्या तेजश्री गायकवाड यांनी बाजी मारली. एकंदरीत या शर्यतीमध्ये कोल्हापूरने सर्वाधिक चार तर मुंबईने तीन विजेतेपदे पटकावली.

सविस्तर निकाल
५ किमी – पुरुष : १. रमेश सिंग, २. आशुतोष पिंजण, ३. अभिषेक कित्तुर. महिला : १. तेजश्री गायकवाड, २. आकांक्षा महाजन, ३. निकिता पटेल. मुले : १. जितेश शास्त्री, संदेश मालवणकर, ३. वैभव विके. मुली : १. पूजा कुमारे, २. अंकिता प्रभू, ३. गिरीशा टोकेकर.
३ किमी – पुरुष (२६ ते ३५ वयोगट) : १. अमर पाटील, २. क्षितिज बेलापुरे, ३. गिरीश मुलूक. महिला : १. श्वेता म्हात्रे, २. रिषू पालांडे, ३. डिंपल राव. पुरुष (३६ ते  ४५ वयोगट) : १. संदीप भोईर, २. किशोर पाटील, ३. संजय जाधव. महिला : १. सुखजित कौर, २. स्मिता कातवे, ३. सायली ठोसर. पुरुष (४६ ते ५५ वयोगट) : १. श्रीमंत गायकवाड, २. सतीश कदम, ३. प्रकाश वरदकर. महिला : १. मनीषा द्विवेदी, २. गायत्री फडके, ३. अनुपमा वारकर. मुले : १. अनिकेत चव्हाण, २. प्रथमेश मोरे, ३. अशोक गावडे. मुली : ऋग्वेदा दळवी, २. सिद्धी कोतवाल, ३. कर्वी गायकवाड.
२ किमी – पुरुष : १. भोजराज मेश्राम, २. सुभाष बागवे, ३. महादेव तावरे. महिला : १. वर्षां कुलकर्णी, २. स्वप्ना वाणी, ३. उषाकिरण ठाकरे.  मुले : १. अनिकेत कित्तुर, २. चंदन बिस्वाल, ३. मनीष खोमाने. मुली : १. हिमानी फडके, २. सई पाटील, ३. रेवती रेगेनवार.

बचाव पथकाने ७५ जणांना वाचवले
स्पर्धेसाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटी इंडियाच्या बचाव पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या बचाव पथकाने जवळपास ७५ जणांचे शर्यतीदरम्यान प्राण वाचवले. सकाळी पाच वाजल्यापासून युसूफ चुडेसरा यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांच्या पथकाने समुद्रामध्ये गस्त घालण्याबरोबरच शर्यतीच्या किनाऱ्यावरील नियोजनामध्येही भाग घेतला. प्रत्येक गटाची सुरुवात करण्याबरोबरच त्यांनी प्रत्येक गटावर लक्ष ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची चोख जबाबदारी घेतली. त्याचबरोबर रस्ता चुकणाऱ्या जलतरणपटूंनाही त्यांनी योग्य मार्ग दाखवण्याचे काम केले. दरम्यान, ही शर्यत सुखरुपपणे पार पडावी यासाठी आयोजकांनी सहा महिन्यांपूर्वीच सर्व जलतरणपटूंचा विमा उतरवला होता.