आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची मुक्त आणि नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची गरज आहे, असे निरीक्षण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. या प्रकरणी श्रीनिवासन यांनी अद्याप मौन बाळगले आहे. बुधवारी त्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. श्रीनिवासन यांचे साम्राज्य खालसा होण्याची वेळ आल्यामुळे ते आता अध्यक्षपद वाचवण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांची चाचपणी करत आहेत.
श्रीनिवासन यांचे वकील पी. एस. रामन यांनी सकाळी श्रीनिवासन यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. पण या भेटीबाबतचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. ‘‘बुधवारी श्रीनिवासन यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळेच मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो,’’ असे रामन यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का, असे विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले.
आगामी आयपीएल संयोजनाच्या तयारीसाठी सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) असलेले बीसीसीआयचे सचिव संजय पटेल हे आपला दौरा आटोपून श्रीनिवासन यांची भेट घेणार असल्याचे समजते. या दोघांच्या भेटीनंतरच बीसीसीआयची पुढील कार्यवाही ठरणार आहे. श्रीनिवासन हे लगेचच राजीनामा देण्याच्या तयारीत नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी झाल्यानंतरच ते अंतिम निर्णय घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना अध्यक्षपदावरून पायउतार होण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला आहे. तसे न झाल्यास, सर्वोच्च न्यायालय पायउतार होण्याबाबतचे आदेश जारी करणार आहे. बीसीसीआयच्या पाच उपाध्यक्षांपैकी शिवलाल यादव, रवी सावंत आणि चित्रक मित्रा या तीन उपाध्यक्षांनी श्रीनिवासन यांच्यावर अप्रत्यक्ष दबाव आणला आहे.