बंगळुरू शहरात रविवारी दिवसभर संततधार पावसाची बरसात झाल्याने भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला.

पहाटेपासूनच पावसाला प्रारंभ झाला, परंतु सकाळी १०च्या सुमारास पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सकाळी १०.३० वाजता सामना सुरू होईल या अपेक्षेने खेळाडू सामन्याआधीच्या सरावाला सुरुवात केली, पण काही काळातच मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने मैदानाला झाकून ठेवले. मग दुपारच्या सुमारासही पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यानंतर मैदानावरील पंच इयान गोल्ड आणि रिचर्ड केटलबोरोघ यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली.
हवामान खात्याने सोमवारीसुद्धा मोठय़ा पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दुसरी कसोटी निकाली ठरण्याची आशा मावळू लागली आहे. पहिल्या दिवशी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी चार बळी घेत दक्षिण आफ्रिकेला २१४ धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेकडून ए बी डी’व्हिलियर्सने सर्वाधिक ८५ धावा केल्या. मग भारताने बिनबाद ८० अशी छान सुरुवात केली. शिखर धवन आणि मुरली विजय अनुक्रमे ४५ आणि २८ धावांवर खेळत आहेत.