भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका

एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताच्या काही गोलंदाजांच्या आणि क्षेत्ररक्षकांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यामुळे न्यूझीलंड भूमीवरील यशोमालिका खंडित झाली. या धक्क्यातून सावरत आणि धडा घेत शनिवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयपथावर परतण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

ट्वेन्टी -२० मालिकेत भारताने ५-० असे निभ्रेळ यश मिळवले. परंतु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच लढतीत न्यूझीलंडने चार गडी राखून विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. सेडन पार्कच्या मैदानावर न्यूझीलंडने कमाल करताना आव्हानात्मक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. दुसऱ्या सामन्याचे ईडन पार्क मैदान हे छोटे असल्यामुळे नंतर फलंदाजी करणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. या मैदानावर झालेल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण यशस्वी पाठलाग करीत सामने मात्र भारताने जिंकले. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपासूनच भारताचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा ढासळला आहे. न्यूझीलंडमधील जोरदार वाऱ्यांमुळे उंचावरील झेल आव्हानात्मक ठरतात.

ठाकूर, जाधवला विश्रांती?

पहिल्या सामन्यात कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा हे गोलंदाज महागडे ठरले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात ठाकूरऐवजी सैनीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ईडन पार्कच्या मैदानाचे स्वरूप पाहता केदार जाधवला खेळवणे धोक्याचे ठरेल. कामचलाऊ फिरकी करू शकणाऱ्या जाधवला कोहलीने हॅमिल्टन येथे एकही षटक टाकू दिले नाही. त्यामुळे अष्टपैलू शिवम दुबे किंवा मधल्या फळीतील विश्वासार्ह फलंदाज मनीष दुबे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल. मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ या नव्या सलामीवीर जोडीने सेन पार्कवर ५० धावांची सलामी दिली. परंतु त्यांच्याकडून संघ व्यवस्थापनाला मोठय़ा अपेक्षा आहेत.

जॅमिसनचे पदार्पण

नियमित कर्णधार केन विल्यम्सनला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. परंतु ट्वेन्टी-२० मालिकेत पाटी कोरी राहिल्यानंतर नेतृत्व बदलाचा फायदा न्यूझीलंडला झाला. प्रभारी कर्णधार टॉम लॅथमने मधल्या फळीत हिमतीने किल्ला लढवला. विजयात शतकी योगदान देणारा रॉस टेलर सातत्याने धावा करीत आहे. स्कॉट कुगेलिन दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. इश सोधीला विश्रांती देऊन ऑकलंडचा सहा फूट, आठ इंच उंचीच्या कायले जॅमिसनला न्यूझीलंडकडून शनिवारी पदार्पणाची संधी मिळू शकेल.

संघ

*  भारत : विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी.

*  न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम लॅथम (यष्टिरक्षक), मार्टिन गप्तिल, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम, जिम्मी नीशाम, स्कॉट कुगेलिन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोलस, मिचेल सँटनर, हमिश बेनेट, टिम साऊदी, कायले जॅमिसन.

*  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण :  स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.