फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट्स क्लब्ज ऑफ इंडियाच्या (एफएमएससीआय) इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिपची दुसरी फेरी ‘महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रॅली ऑफ महाराष्ट्र’ ६ ते ९ जून या कालावधीत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात रंगणार आहे. वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशनतर्फे (विसा) या फेरीचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने नाशिककरांना मोटार स्पोर्ट्समधील थरार अनुभवायला मिळणार आहे.
एकूण पाच फेऱ्या असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेची पहिली फेरी चेन्नई येथे २२ ते २४ मार्च या कालावधीत झाली. दुसरी फेरी नाशिक व नगर जिल्ह्यातील काही भागात तर, तिसरी फेरी जुलैमध्ये कोइम्बतूर, चौथी फेरी सप्टेंबरमध्ये बंगळुरू आणि अंतिम फेरी नोव्हेंबरमध्ये चिकमंगलूर येथे होणार आहे.
६ जून रोजी शहरातील राजीव गांधी भवनजवळ दुसऱ्या फेरीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी दादासाहेब फाळके स्मारकमध्ये दुपारी ४ वाजता खास नाशिककरांसाठी विशेष प्रेक्षणीय फेरी होणार आहे. प्रेक्षकांनी अर्धा तास आधी या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी ‘विसा’ने फेरीचा मार्ग पूर्णपणे बदलला असून घोटी-सिन्नर मार्ग परिसरातील ओबडधोबड रस्त्यांवरून वाहने धावणार आहेत. आठ जून रोजी सकाळी सात वाजेपासून स्पर्धेला सुरूवात होईल. रविवारी दुपारी पावणेदोन वाजता नाशिक येथील गेटवे हॉटेलजवळ स्पर्धेचा समारोप होणार असल्याची माहिती बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विसाचे अश्विन पंडित यांनी दिली.
मागील वर्षीचा विजेता अमित्रजीत घोष यावर्षीही पहिल्या फेरीअखेर ३९ गुणांसह आघाडीवर असून विक्रम देवदासन (२९ गुण) व्दितीय स्थानी आहे.
 स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) गटात महिंद्रच्या वाहनासह उतरणारा व सर्वाचे आकर्षण असलेला गौरव गिल हा ३९ गुणांसह आघाडीवर आहे.
देशातील युवा प्रतिभावंतासाठी असलेल्या जेआयएनआरसी गटात सुहेम ३९ गुणांसह आघाडीवर आहे. महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रॅली ऑफ महाराष्ट्र या दुसऱ्या फेरीत ३० ते ३२ स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांतर्फे समीर बुरकुले यांनी दिली.