घरच्याच मैदानावर प्रेक्षकांशिवाय खेळणाऱ्या इंग्लंडची पुन्हा ‘कसोटी’ लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारपासून इंग्लंडची दुसरी कसोटी सुरू होत आहे.

वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटी सामन्यावर वर्चस्व गाजवले असून आता दुसऱ्या कसोटीतील विजयासह मालिके तील आघाडी मजबूत करण्यासाठी पाहुणा संघ सज्ज झाला आहे. मात्र घरच्या मैदानात

मालिकेतील आव्हान कायम टिकवण्यासाठी इंग्लंड उत्सुक आहे.

इंग्लंडसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा नियमित कर्णधार जो रूटचे संघात पुनरागमन झाले आहे. पहिल्या कसोटीत रूटची उणीव यजमानांना चांगलीच जाणवली होती. रूटचा समावेश झाल्याने सलामीवीर जो डेन्ली याला कसोटीतून डच्चू मिळाला आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही पारडय़ांवर विंडिजने पहिल्या कसोटीत पूर्णपणे वर्चस्व राखले होते. ‘‘तीन आठवडेआधी इंग्लंडमध्ये दाखल झाल्याचा फायदा तेथील वातावरणाशी, मैदानाशी जुळवून घेण्याकरिता झाला. मालिका विजयासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,’’ अशी वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांची प्रतिक्रिया खूप काही सांगते.

वेस्ट इंडिजकडून श्ॉनन गॅब्रियल आणि अल्झारी जोसेफ या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. विंडिजच्या सर्वच फलंदाजांनी पहिल्या कसोटीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या कसोटीत अखेरच्या दिवशी २०० धावांचे आव्हान गाठताना ३ बाद २७ अशा परिस्थितीतून मधल्या फळीतील फलंदाजांनी दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला. याउलट इंग्लंडला सर्व पारडय़ांवर खेळ उंचावण्याची गरज आहे. रूट, स्टोक्स यांच्याकडून फलंदाजीत तर जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर यांच्याकडून गोलंदाजीत मोठय़ा अपेक्षा आहेत. फिरकीपटू डॉम बेसला अजूनही लय सापडलेली दिसत नाही.

वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या कसोटीतून वगळल्याने जाहीर नाराजी केली व्यक्त केली होती. या सर्व स्थितीत मालिका वाचवण्याचे आव्हान यजमान इंग्लंडसमोर आहे.

वेळ : दुपारी ३:३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स.