भारत-द. आफ्रिका ‘अ’ क्रिकेट मालिका

कर्णधार आणि फलंदाज म्हणून पहिल्या कसोटीत छाप पाडल्यानंतर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या चारदिवसीय क्रिकेट कसोटी सामन्यात पुन्हा एकदा प्रतिभावान युवा खेळाडू शुभमन गिलच्या कामगिरीवरच सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे. या कसोटीसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व अनुभवी वृद्धिमान साहाकडे देण्यात आले असून मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी २० वर्षीय गिलला भारताच्या मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या सामन्यात अधिकाधिक धावा करून आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सलामीवीर अथवा मधल्या फळीतील फलंदाजांसाठी दावेदारी पेश करण्याची गिलला सुवर्णसंधी आहे.

थिरुवनंतपुरम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने आफ्रिकेला सात गडी राखून धूळ चारली. त्या सामन्यात गिलने पहिल्या डावात ९० धावांची खेळी साकारली होती. त्याशिवाय जलज सक्सेना आणि शाहबाज नदीम यांनीसुद्धा भारताच्या विजयात उपयुक्त योगदान दिले होते. त्यापूर्वी झालेल्या एकदिवसीय मालिकेतही भारताने ४-१ असे वर्चस्व गाजवले होते.

दुसरीकडे साहासुद्धा भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळवण्यासाठी उत्सुक आहे. युवा ऋषभ पंत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्याने अपयशी ठरला होता. त्यामुळे साहाला निवड समितीचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागेल. मुंबईकर शिवम दुबेला पहिल्या कसोटीत फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्यालाही या सामन्याद्वारे लय प्राप्त करण्याची संधी आहे.

एडीन मार्करमच्या नेतृत्वाखालील आफ्रिका ‘अ’ संघातही अनेक गुणी खेळाडूंचा भरणा असून लुंगी एन्गिडी, हेन्रिच क्लासेन, खाया झोंडो या खेळाडूंवर त्यांची प्रामुख्याने भिस्त आहे.

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.