विकसित फलंदाजी आणि पाटा खेळपट्टीवरील नियंत्रित गोलंदाजी यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत रवींद्र जडेजाला रविचंद्रन अश्विनपेक्षा प्राधान्य देण्यात आले, असे स्पष्टीकरण भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी दिले.

पहिल्या कसोटीतसुद्धा वेस्ट इंडिजमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या अश्विनला डावलून जडेजाला संघात स्थान देण्यात आले. त्या वेळी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली होती; परंतु दडपण झुगारत साकारलेले अर्धशतक आणि दोन बळी या बळावर जडेजाने आपली निवड सार्थ ठरवली.

‘‘जडेजाची कामगिरी अप्रतिम होत आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून नाव संपादन करणाऱ्या जडेजाने आता फलंदाजीतही सुधारणा केली आहे. याचप्रमाणे वेस्ट इंडिजमधील खेळपट्टय़ांवर नियंत्रित गोलंदाजी केल्याशिवाय फिरकी गोलंदाजांना यश मिळणे कठीण आहे,’’ असे शास्त्री यांनी सांगितले.