भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या डोक्याला चेंडू आदळल्यामुळे ‘कन्कशन’च्या नियमाचा फायदा उठवत भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यावर वर्चस्व गाजवले. आता जडेजाने माघार घेतली असली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी पाहुणा भारतीय संघ उत्सुक आहे.

ट्वेन्टी-२० मालिका विजयामुळे भारतीय संघाचा कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास उंचावणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताने अखेरची एकदिवसीय लढत आणि पहिली ट्वेन्टी-२० लढत जिंकल्यानंतर आता सिडनी क्रिकेट मैदानावर होणारे पुढील दोन्ही ट्वेन्टी-२० सामने जिंकून कसोटी मालिकेसाठी मानसिकदृष्टय़ा सज्ज होण्याचे ठरवले आहे.

‘कन्कशन’च्या नियमामुळे जडेजाच्या जागी यजुर्वेद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने गोलंदाजीत आपली छाप पाडत भारताला विजय मिळवून दिला. कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विजयी संघात कोणतेही बदल न करण्याचे संकेत दिले आहेत. सलामीला संधी मिळालेल्या लोकेश राहुलने अप्रतिम कामगिरी करत भारताच्या विजयात योगदान दिले. मात्र मधल्या आणि तळाच्या फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे भारताला पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सलामीवीर शिखर धवनकडून भारताला मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर कोहलीलाही कर्णधाराच्या लौकिकाला साजेशी खेळी करता आली नाही. त्यामुळे त्याच्याकडून दमदार कामगिरी अपेक्षित आहे.

मनीष पांडेला दुसरी संधी?

फिरकीपटू अ‍ॅडम झम्पाच्या गोलंदाजीसमोर मनीष पांडे चाचपडताना दिसला. सुरुवातीचे काही चेंडू निर्धाव घेतल्यामुळे भारताच्या धावगतीला वेसण बसली. त्यामुळे आक्रमक फलंदाजी करणाऱ्या पांडेला दुसऱ्या सामन्यात संधी मिळणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पांडे आणि श्रेयस अय्यर हे एकाच धाटणीचे फलंदाज असल्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजावर हल्ला चढवण्याआधी ते काही चेंडू खेळून काढतात. संजू सॅमसन आणि हार्दिक पंडय़ा यांनी आपापली कामगिरी चोखपणे निभावली असली तरी त्यांच्याकडून मोठय़ा फटकेबाजीची आशा आहे.

ऑस्ट्रेलियाला दुखापतीची चिंता

दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरने ट्वेन्टी-२० मालिकेतून माघार घेतली असून त्यात आता कर्णधार आरोन फिंचच्या दुखापतीची भर पडली आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्याने फिंचच्या समावेशाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच भारत ‘अ ’आणि ऑस्ट्रेलिया ‘अ ’ यांच्यात होणाऱ्या सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापनाने अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला मुक्त केले असून त्याच्या जागी अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनचा समावेश केला आहे. त्यामुळे मिचेल स्वीपसनच्या जागी त्याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चहलच्या समावेशाविषयी इतकी चर्चा का? -गावस्कर

सामनाधिकारी हे ऑस्ट्रेलियाचेच माजी क्रिकेटपटू असल्याने त्यांना ‘कन्कशन’च्या नियमानुसार जडेजाच्या जागी चहलला संधी देण्यात कोणतीही अडचण जाणवली नाही. ऑस्ट्रेलियाच्याच सामनाधिकाऱ्याला याविषयी आक्षेप नसताना ‘कन्कशन’ची इतकी चर्चा का होतेय, हेच मुळात मला समजत नाही, असे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. उसळते चेंडू खेळण्याची असमर्थता असणाऱ्या फलंदाजांसाठी ‘कन्कशन’ची संकल्पना मला पटलेली नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ‘‘उसळते चेंडू खेळता न आल्याने चेंडू तुमच्या हेल्मेटवर आदळला तर तुम्ही बदली खेळाडू घेण्याच्या पात्रतेचे नाहीत, असे माझे स्पष्ट मत आहे,’’ असेही गावस्कर म्हणाले.

प्रामाणिक, जबाबदारीने नियमांचा वापर करा -टेलर

‘कन्कशन’चा नियम हा खेळाडूंच्या संरक्षणासाठी असून त्याचा वापर प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने व्हायला हवा, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी व्यक्त केले. ‘‘चेंडू नुसता हेल्मेटवर आदळला तरी या नियमाचा वापर करण्याची गरज नाही. त्यासाठी बदली धावपटूचा नियम आहेच. त्यामुळे प्रामाणिक आणि जबाबदारीने ‘कन्कशन’च्या नियमाचा अवलंब करावा की नाही, हे सर्वस्वी त्या फलंदाजावर अवलंबून आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचे माजी सदस्य असलेल्या टेलर यांनी म्हटले.

 

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अगरवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी. नटराजन आणि शार्दूल ठाकूर

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), सीन अबॉट, मिचेल स्वीपसन, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन लायन, जोश हेझलवूड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट

*  सामन्याची वेळ : दुपारी १.४० वा.पासून

*   थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३