ऑलिम्पिक पदकविजेता योगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिकसाठी पदकाचे आशास्थान आहे. ऑलिम्पिकपूर्व वर्षांत त्याच्या हातून दिमाखदार कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र दुखापतीचे खरे स्वरूप लपवून योगेश्वर लास व्हेगास येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना झाला. स्पर्धेसाठी नियुक्त डॉक्टरांनी योगेश्वरला दुखापतीमुळे खेळण्यास अपात्र ठरवले. डॉक्टरांनी मनाई केल्यामुळे योगेश्वरच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
योगेश्वरची लढत गुरुवारी १० तारखेला होणार आहे. लढतीपूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी आशा आहे. योगेश्वरला लढतीसाठी अपात्र ठरवल्याचे वृत्त चुकीचे आहे असे भारताचे मुख्य फ्रीस्टाइल प्रशिक्षक कुलदीप मलिक यांनी सांगितले. अजूनही वजन चाचणी झालेली नाही. वैद्यकीय चाचणी बुधवारी घेण्यात येईल आणि त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल असे त्यांनी पुढे सांगितले.
या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी योगेश्वरच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र स्वत: योगेश्वरने आपण पूर्णपणे तंदुरुस्त असून, या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहोत, असे भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. योगेश्वरच्या बोलण्यावर विश्वास ठेवत महासंघाने अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याचा संघात समावेश केला. त्यानुसार योगेश्वर लास व्हेगाससाठी रवाना झाला. ६५ किलो वजनी गटाच्या लढतीपूर्वी योगेश्वरची डॉक्टरांनी चाचणी घेतली. मात्र पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. या गटात त्याच्याकडून पदकाची आशा होती. योगेश्वरच्या सक्तीच्या माघारपणामुळे भारतीय पथकाला मानहानी पत्करावी लागली.
शंभर टक्के तंदुरुस्त नसताना योगेश्वरला स्पर्धेसाठी का पाठवण्यात आले, असे विचारले असता भारतीय कुस्ती महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘गुडघ्याच्या दुखापतीमधून ९० टक्के तो तंदुरुस्त झाला होता. अमेरिकेतील जागतिक स्पर्धेमधील लढतीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी आशा वाटत होती, त्यामुळे महासंघाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला पाठवण्यास परवानगी दिली होती. जागतिक स्पर्धेतून योगेश्वरला माघार घ्यावी लागली असली तरी अजूनही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी चार स्पर्धा आहेत. त्यापूर्वी तो दुखापतीमधून शंभर टक्के तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे.’’
६५ किलो वजनी गटातून योगेश्वरच्या जागी अन्य खेळाडूने सहभागी व्हावे यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांचा प्रयत्न होता. मात्र पर्यायी खेळाडू अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसा मिळणे आवश्यक असते. अमेरिकेच्या दूतावासाने सहकार्य न केल्याने ६५ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व असणार नाही. योगेश्वरऐवजी अमित धनकरला या गटातून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी होती. अमितने योगेश्वरच्या तंदुरुस्तीसंदर्भात तक्रार केली होती.