आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर सध्या सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. संघातले त्याचे सहकारी, राजकारणी, बॉलिवूड सेलिब्रेटी त्याला दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा देत आहेत. सध्याचा भारतीय संघाचा उप-कर्णधार आणि मुळचा मुंबईकर खेळाडू रोहित शर्मानेही निवृत्तीनिमीत्त धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या धोनी आणि रोहित शर्मा आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करत आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. भारतीय क्रिकेटमधला सर्वात प्रभावशाली व्यक्ती…भारतीय संघात आम्हाला त्याची उणीव नेहमी भासत राहिल. १९ तारखेला नाणेफेकीदरम्यान भेटू अशा शब्दांत रोहितने धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा यशस्वी होण्यामागे धोनीचाही मोठा वाटा आहे. २०१३ साली इंग्लंडविरुद्ध मोहाली वन-डे सामन्यात धोनीनेच रोहितला सलामीला येण्याची संधी दिली. रोहित आणि धोनीमध्ये आयपीएलमध्येही ही स्पर्धा सुरु असते. रोहितने मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वकौशल्याने ४ विजेतेपदं मिळवून दिली आहेत. धोनी सध्या आगामी आयपीएल हंगामाची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामासाठी धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.

अवश्य वाचा – निवृत्ती जाहीर करण्याआधी धोनी काय करत होता?? जाणून घ्या…