19 January 2019

News Flash

थाळीफेकमध्ये सीमाला रौप्य आणि नवजीतला कांस्यपदक

३४ वर्षीय सीमाने दुसऱ्या प्रयत्नात ५९.५७ मीटर अंतर गाठले

थाळीफेक प्रकारातील दोन पदकांसह भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील अ‍ॅथलेटिक्सच्या पदकांचे खाते उघडले. सीमा पुनिया आणि नवजीत कौर ढिल्लन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

सीमाने कारकीर्दीतील सलग चौथ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची किमया साधताना पहिल्याच प्रयत्नात ६१.४१ मीटर ही कामगिरी नोंदवली, तर नवजीतने अखेरच्या प्रयत्नात ५७.४३ मीटर अंतरावर थाळी फेकली. माजी विश्वविजेत्या डॅनी स्टीव्हन्सने (ऑस्ट्रेलिया) ६८.२६ मी. थाळीफेक करीत स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

३४ वर्षीय सीमाने दुसऱ्या प्रयत्नात ५९.५७ मीटर अंतर गाठले, मात्र तिचा तिसरा आणि पाचवा प्रयत्न अपयशी ठरला. याचप्रमाणे चौथ्या आणि सहाव्या प्रयत्नात तिने अनुक्रमे ५८.५४ मी. आणि ५८.९० मी. अंतरावर थाळीफेक केली. कारकीर्दीतील अखेरच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सीमाने यंदाच्या हंगामात फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ६१.०५ मी. अंतरावर थाळीफेक केली होती. मात्र २००४मध्ये तिने ६४.८४ मी. ही कारकीर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी साकारली होती. ३४ वर्षीय सीमाने राष्ट्रकुलमध्ये प्रत्येक प्रयत्नात यश मिळवले आहे. २००६मध्ये मेलबर्नला तिने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर २०१०मध्ये रौप्य आणि २०१४मध्ये कांस्यपदक पटकावले होते.

First Published on April 13, 2018 3:13 am

Web Title: seema punia commonwealth games 2018