भारताची आशियाई सुवर्णपदक विजेती थाळीफेकपटू सीमा पुनिया रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. कॅलिफोर्नियातील (अमेरिका) सॅलिनास येथे चालू असलेल्या पॅट यंग्स थ्रोवर्स क्लासिक २०१६ स्पध्रेत तिने हे निकष पूर्ण केले.
३२ वर्षीय सीमाने ६२.६२ मीटर थाळी फेकण्याची किमया साधली. रिओ ऑलिम्पिकसाठी ६१ मीटर अंतर हे निकष ठेवण्यात आले होते. सीमाने या स्पध्रेत सुवर्णपदक मिळवण्याचा पराक्रम साधताना अमेरिकेच्या स्टेफनी ब्राऊन-ट्रॅफ्टनला मागे टाकले. स्टेफनीने २००८मध्ये देशाला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले होते.
सीमा यंदा तिसऱ्यांदा ऑलिम्पिकवारी करणार आहे. याआधी २००४ आणि २०१२मध्ये ती ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत सहभागी झाली होती. मात्र पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यातच ती अपयशी ठरली होती. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील मैदानी क्रीडा प्रकारांसाठी पात्र ठरलेली ती १९वी खेळाडू आहे. ‘टॉप’ योजनेंतर्गत मिळालेल्या निधीमुळे आता सीमा अमेरिकेत विशेष सराव करणार आहे. हरयाणावासी सीमाने २००४मध्ये आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम थाळीफेक ६४.८४ मीटर अशी नोंदवली होती.
दरम्यान, २०१०मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत विजेतेपद पटकावणाऱ्या कृष्णा पुनियाने सॅन दिएगो येथील स्पध्रेत ५७.९७ अंतरावर थाळी फेकून रौप्यपदकाची कमाई केली आहे.

सीमाचे यश
* २०१४ आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक.
* २०१४ राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत रौप्यपदक.
* २००६ राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत रौप्यपदक.
* २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत कांस्यपदक.
२००४पासून कारकीर्दीत अनेक बदल मी अनुभवले आहेत. थाळीफेक ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे. यावेळी मला फार तयारी करावी लागणार नाही, अशी माझी धारणा आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये माझी सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळेल.
– सीमा पुनिया , थाळीफेकपटू