इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये थाळीफेक प्रकारात भारताच्या सीमा पुनियाने कांस्यपदकाची कमाई केली. या विजयानंतर सीमाने आपल्याला खेळांच्या सरावासाठी मिळणाऱ्या खर्चाची रक्कम केरळमधील पूरग्रस्तांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमा आपल्याला खर्चासाठी मिळालेले ७०० अमेरिकन डॉलर (अंदाजे ४९ हजार रुपयांच्या घरात) आणि स्वतःच्या खिशातून १ लाख रुपयाची रक्कम केरळमधील पूरग्रस्तांना देणार आहे. सीमाने आपल्या सहकारी खेळाडूंनाही केरळमधील कामात आपला वाटा उचलण्याचं आवाहन केलं आहे.

“गेल्या काही दिवसांच्या काळात केरळमधील लोकांनी अनेक यातना सोसल्या आहेत. अनेकांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासाठी मी माझ्याकडून छोटीशी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.” सीमा प्रसारमाध्यमांशी बोलत होती. ३५ वर्षीय सीमाला आपलं २०१४ आशियाई खेळांमधलं सातत्य राखता आलं नाही. २०१४ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये सीमाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र यंदा तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मात्र अशाही परिस्थितीत तिने जमलेल्या सामाजिक भानामुळे सध्या तिचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.