नेट्समधल्या सरावाला कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वात उशिरा आला, नेट्समध्ये दाखल झाल्यावर त्याने सरावाला सुरुवात करण्यापूर्वी विक्रम राठोड आणि साबा करीम या निवड समितीतील सदस्यांशी बातचित केली. धोनी संवाद साधून निघून गेल्यानंतर राठोड आणि करीम या दोघांनीही वीरेंद्र सेहवागला बोलावले आणि त्याच्याशी चर्चा केली, यावरून एकंदरीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सेहवागला वगळण्याची शक्यता बळावली आहे. सेहवागबरोबर गौतम गंभीरलाही गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे यापैकी एकाला वगळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. गंभीरपेक्षा सेहवागवर निवड समितीची करडी नजर असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दोन सामन्यांमध्ये सेहवागने अनुक्रमे ४ आणि ३१ धावा केल्या आहेत, तर गंभीरने ४ आणि ११ अशा धावा केल्या आहेत. विराट कोहलीलासुद्धा या मालिकेत आपली छाप पाडता आलेली नाही, त्याने दोन सामन्यांमध्ये मिळून फक्त ६ धावा केल्या आहेत. कोहलीने गेल्या वर्षांत चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला वगळण्यात येणार नाही, गंभीरपेक्षा सेहवागवर या वेळी निवड समितीची कुऱ्हाड पडेल, असे वाटत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वाधिक १६७ धावा केल्या आहेत आणि एकदाही तो बाद झालेला नाही, त्यामुळे त्याला वगळण्याचा विचार निवड समिती सध्या करणार नाही. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतल्यास त्याची जागा घेणारा खेळाडू सध्या तरी कुणी दिसत नाही.
सेहवागला वगळल्यावर त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला सलामीची संधी देण्यात येईल, त्याचबरोबर रिक्त झालेल्या जागेसाठी चेतेश्वर पुजाराची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे. सरावादरम्यान संघात नसलेल्या अमित मिश्रा, ईश्वर पांडे, परवेझ रसोल आणि शामी मोहम्मद या खेळाडूंना सरावासाठी बोलवण्यात आले होते. यंदाच्या रणजी मोसमात ईश्वर, परवेझ आणि शामीकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यांच्यापैकी एकाला तरी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते.